नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय लष्कर आणि सिंगापूरच्या लष्करादरम्यान महाराष्ट्रात देवळाली येथे फील्ड फायरिंग रेंजवर १३ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झालेल्या अग्नी वॉरियर या १२ व्या द्विपक्षीय युद्ध सरावाचा ३० नोव्हेंबर २०२२ रोजी समारोप झाला. या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या लष्करांच्या तोफखाना दळांनी आपल्या संयुक्त मारक सामर्थ्याचे नियोजन, त्यावर अंमलबजावणी आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर यांचे दर्शन घडवले.
या सरावामध्ये संयुक्त नियोजनाचा भाग म्हणून दोन्ही बाजूंचा समावेश असलेल्या एका संयुक्त कंप्युटर वॉर गेमचा देखील समावेश होता. दोन्ही दळांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तोफखाना निरीक्षण सिम्युलेटर्स वापर संयुक्त प्रशिक्षणाच्या टप्प्यांतर्गत केला. तोफखाना आणि तोफखाना नियोजनाच्या प्रक्रियेत सुधारणा यामधील आधुनिक कल या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांच्या चर्चासत्रांचेही आयोजन यामध्ये करण्यात आले. संपूर्णपणे देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या तोफा आणि उर्ध्व दिशेच्या कोनात मारा करणाऱ्या हॉवित्झर तोफांचा देखील सरावाच्या अंतिम टप्प्यात समावेश करण्यात आला.
दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान सराव आणि प्रक्रियाबाबत परस्पर सामंजस्य वाढवण्याचा आणि परिचालनक्षमता वाढवण्याचा उद्देश या सरावाने साध्य झाला. युद्धसरावाच्या समारोपाला सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त वॉन्ग वेई कुएन आणि स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस हरीमोहन अय्यर यांच्यासह दोन्ही देशांच्या लष्करातील अधिकारी आणि सिंगापूरचे इतर मान्यवर उपस्थित होते.