मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आणखी दोन वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. केंद्रातील भाजप सरकार विरोधात तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचा श्रीगणेशा आज झाला आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी आज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक तास चर्चा झाली असून त्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री केसीआर राव म्हणाले की, महाराष्ट्र आणि तेलंगाणा ये दोन्ही राज्यांमध्ये उत्तम संबंध आहेत. आज आम्ही नवी सुरुवात केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. देशातील आजची स्थिती अत्यंत वाईट आहे. लोकशाहीसाठी आम्ही हातात हात मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून मला खुप आनंद झाला आहे. ही सुरुवात आहे. यापुढील काळात अनेक बाबी घडणार आहेत. महाराष्ट्रातून ज्या बाबींना सुरुवात होते ती पुढे खुप मोठी होते. देशाच्या विकासासाठी आता आम्ही एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमचे उत्तम आदरातिथ्य केले. मी त्यांना हैदराबादला येण्याचे निमंत्रण देत आहोत. यापुढील काळात देशातील राजकारणाबाबत आम्ही तेव्हाही सविस्तर चर्चा करु, असे राव यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशात होत असलेल्या सुडाच्या राजकारणाविरोधात आता आवाज उठविण्याची वेळ झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आता एकत्र आलो आहोत. सुडाचे राजकारण आम्ही कधीही करीत नाही. तशी आमची परंपरा नाही. आमचं हिदुत्व हे वेगळे आहे. देशाला मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. आणि त्याच मुद्द्यावर आमची सहमती झाली आहे. देशात आणि राज्या-राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहिले पाहिजे. लोकशाही टिकली आणि वाढली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्याची सुरुवात आता झाली आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा झाली. या शिष्टमंडळासमवेतच्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते. बैठकीत बाभळी बंधारा, तुम्मीदीहेटी, मेडीगड्डा बॅरेज, चन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच उभय राज्यात सुरु असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने ऊहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.
मुख्यमंत्री श्री. राव यांच्या समवेतच्या शिष्टमंडळात खासदार रणजित रेड्डी, खासदार संतोष कुमार, खासदार बी. पी. पाटील, आमदार पल्ला राजेश्वर रेड्डी, आमदार श्रीमती के. कविता, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे महासचिव श्रवण रेड्डी, तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आदींचा समावेश होता. सुरवातीला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री. राव यांचे पुष्पगुच्छ, शाल तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. राव यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचाही सत्कार केला. मुख्यमंत्री श्री. राव यांच्यासमवेतच्या शिष्टमंडळातील सदस्यांचेही पुष्पगुच्छ आणि तसेच ‘महाराष्ट्र देशा’, ‘पहावा विठ्ठल” देऊन स्वागत करण्यात आले.