इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील जोधपूर शहरात काल रात्री दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. जालोरी गेटवर झेंडा उतरवून त्या जागी दुसरा झेंडा लावण्यावरून वाद सुरू झाला. यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीत डीसीपी भुवन भूषण यादव, एसएचओ अमित सिहाग यांच्यासह चार पोलिस आणि काही मीडिया कर्मचारीही जखमी झाले आहेत.
ईद आणि अक्षय्य तृतीया या सणाच्या आदल्या रात्री झालेल्या गोंधळाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने शहरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. दगडफेकीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या वादंगानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण पण शांत आहे. जोधपूर जिल्हा प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या लोकांना सलोखा राखून सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील बालमुकंद बिस्सा सर्कल येथील झेंडा हटवून त्याठिकाणी दुसऱ्या समाजाचा झेंडा फडकावण्यावरून वाद सुरू झाला. यावर काही लोकांनी आक्षेप घेतला असता दोन्ही बाजूच्या तरुणांमध्ये हाणामारी झाली. अचानक दगडफेक सुरू झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोधपूर जिल्हा प्रशासनाने सणाच्या निमित्ताने आणखी तणाव निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे. शहरातील शांतता राखण्याचे आवाहनही दोन्ही समाजातील प्रतिष्ठितांनी जनतेला केले आहे.
जोधपूर प्रशासनाने आज अदा होणार्या ईदच्या नमाजासाठी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तणावग्रस्त जालोरी गेट चौकाजवळ एक मोठी ईदगाह आहे, जिथे शेकडो लोक नमाज अदा करण्यासाठी येतात. पोलिसांनी येथे कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, जोधपूरच्या जलौरी गेट परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करून मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो.