इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राजस्थानमधील जोधपूर येथे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अकरा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, सरदार पटेल हे इतिहासातील असे एक पान आहे ज्याला इतिहास आणि राष्ट्र दोघांनीही न्याय दिला नाही. त्यांनी नमूद केले की, सरदार पटेल यांच्यासारख्या थोर व्यक्तीचे गुण, त्याग, कष्ट आणि दूरदृष्टी आज देशाला लाभदायक ठरत आहे, परंतु त्यांना योग्य प्रशंसा आणि सन्मान पूर्वी मिळाला नाही.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दोन वर्षे विविध कार्यक्रम साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महान भारत घडवण्यासाठी आधारभूत रचना तयार होईल. त्यांनी सांगितले की, आज अनावरण केलेला सरदार पटेल यांचा अकरा फूट उंच आणि 1,100 किलो वजनाचा पुतळा, तरुण पिढीला सरदार पटेल यांच्या विचारधारेचे नक्कीच स्मरण करून देईल आणि त्यांना प्रेरणा देत राहील.