नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक युवा कौशल्य दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे शुक्रवार 15 जुलै 2022 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपनीच्या आस्थापनातील 345 अंदाजीत पदासाठी रोजगाराची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होणार आहे. ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन पोर्टलवर लॉगीन करावे. त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02564-295801 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि.रा. रिसे यांनी केले आहे.
Job Opportunity Vacancy Employment recruitment