पुणे – ‘तब्बल साडेपाच लाख रुपये महिना पगाराच्या नोकरीची तुम्हाला ऑफर दिली, तर तुम्ही काय कराल? होय, मी एका पायावर तयार आहे, असे म्हणाल. कारण चांगले पॅकेज असेल तर अनेकदा काम काय आहे, हे सुद्धा कोणी पाहत नाहीत, असे म्हटले जाते. यालाच अनुसरुन कोणाला असे सांगितले की, शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरी म्हणून वर्षाकाठी ६३ लाख रुपये दिले जातील तर तुम्ही काय कराल? अर्थात नेहमीच्या नोकरीतील वैतागलेले अनेक नोकरदार किंवा अगदी अधिकारीपदावरील व्यक्तीही यासाठी एका पायावर तयार होती.
पण ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर खरोखरच ब्रिटनमधील एका कंपनीने अशी ऑफर दिली की, शेतात काम करण्यासाठी ६३ लाखांचं वार्षिक पॅकेज देण्यात येईल. टी. एच. स्लिमेंट्स अॅण्ड सन लिमिटेड या कंपनीने वर्षभर कोबीच्या शेतात काम करण्यासाठी भल्या मोठ्या पगाराची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे या पॅकेजबरोबर अजून काही सवलती देण्यात आल्यात आहेत.
या नोकरीसंदर्भात कंपनीने ऑनलाइन जाहिरात दिली असून वर्षभर शेतामध्ये कोबी आणि ब्रोक्ली तोडण्याच्या कामासाठी तासाला ३० पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार तीन हजारांहूनही अधिक रुपये मिळणार आहेत. वर्षभरासाठीच्या करारानुसार ६२ हजार ४०० पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार ६३ लाख ११ हजार ६४१ रुपये वेतन दिले जाणार आहे. परंतु हे काम अंग मेहनतीचे असून वर्षभर न विश्रांती घेता हे काम करावे लागणार आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीला कोबी तोडणाऱ्या कामगारांची गरज असल्याचं एका जाहिरातीत म्हटलं आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये कोबी आणि ब्रोकोली तोडणार तेवढ्या प्रमाणामध्ये पगार दिला जाणार असल्याने अधिक पैसे कमवण्याचीही संधी आहे. कॉर्पोरेट सॅलरी पॅकेजलाही लाजवेल अशा या शेतीसाठीच्या ऑफरची सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू आहे.
ब्रिटनमध्ये कामगारांची संख्या फारच कमी असल्यामुळेच सरकार सीझनल अॅग्रीकल्चरल वर्कर्स स्कीम म्हणजेच ठराविक काळासाठी शेतीच्या कामांसाठी कामगारांना नियुक्ती धोरणाअंतर्गत परदेशामधून सहा महिन्यांच्या कालावधीची शेतीमालक आणि कंपन्यांना परवानगी देते. शेतांमध्ये काम करणारे मजूर उपलब्ध व्हावेत म्हणून ही सुविधा आहे. केवळ शेतीच नाही अनेक प्रकारच्या नोकऱ्यांसाठी ब्रिटनमध्ये चांगली संधी आहे.