विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना काळात लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय बुडाल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना थोडा आशेचा किरण दिसत आहे. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात अग्रेसर असलेल्या पाच आयटी कंपन्यांमध्ये जवळपास ९६ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा आयटी उद्योगांच्या नासकॉम या संघटनेने केला आहे. २०२२ पर्यंत ऑटोमेशनमुळे भारतीय आयटी कंपन्यांमधील ३० लाख नोकर्या जातील असा दावा बँक ऑफ अमेरिकाने केला होता. त्यानंतर नासकॉमकडून हा दावा करण्यात आला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल तंत्रज्ञ असल्याने हे क्षेत्र सर्वाधिक नियुक्ती करणारे क्षेत्र म्हणून कायम राहिले आहे.
नासकॉमने आपल्या निवेदनात म्हटले, की तंत्रज्ञानाचा विकास आणि स्वचालनात वाढ झाली असून, पारंपरिक आयटी कंपन्या आणि त्यांच्या भूमिका व्यापक स्वरूपात विकसित होतील. त्यामुळे नोकर्यांची निर्मिती होऊ शकेल. आयटी क्षेत्रात कौशल्य आधारित क्षेत्रात सर्वाधिक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. २०२१ या आर्थिक वर्षात १,३८,००० लोकांना नोकर्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ९६ हजारांहून अधिक नियुक्त्यांसाठी एक भक्कम योजना तयार करण्यात आली आहे.
बँक ऑफ अमेरिकेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. आयटी क्षेत्रात ऑटोमेशन वेगाने वाढत असल्याने २०२२ पर्यंत ३० लाख नोकर्या जाण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली होती. यामुळे कंपन्यांची १०० अब्ज डॉलर (७.३ लाख कोटी रुपय) बचत होणार आहे.
टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि कॉग्निजेंटसारख्या कंपन्या पुढील वर्षापर्यंत ऑटोमेशनमुळे कर्मचार्यांची कपात करू शकतात. वेतनाच्या स्वरूपात कंपन्यांची १०० अब्ज डॉलरची बचत होणार आहे. परंतु ऑटोमेशनसाठी १० अब्ज डॉलर खर्चही होणार आहेत. त्याशिवाय पाच अब्ज डॉलर नव्या नोकऱ्यांच्या वेतनावर खर्च होणार आहेत.
कोल इंडिया लिमिटेड या जगातील सर्वात मोठ्या कोळसा उत्खनन कंपनीमधूनही कर्मचार्यांची कपात करण्यात येणार आहे. खर्चात कपात करण्यासाठी दरवर्षी पाच टक्के कर्मचार्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पाच ते दहा वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या कोल इंडियामध्ये २,७२,४४५ कर्मचारी कार्यरत आहेत.
२०२०-२१ च्या मार्चच्या तिमाहीत सरकारी कंपनी कोल इंडियाचा एकत्रित फायदा १.१ टक्के किरकोळ घसरणीसह ४,५८६.७८ कोटी रुपये इतका झाला आहे. विक्री कमी झाल्यामुळे कंपनीला थोडा तोटा सहन करावा लागला. मार्चच्या तिमाहीच्या निकालाच्या एका दिवसानंतर कंपनीने कर्मचार्यांची कपात करण्याची माहिती दिली होती.