इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंबर प्लेटचा फ्रॅाड जसजसा उघडकीस येत जाईल तस तसे या देशातील कार्टेल उघडकीस येत जाईल. नंबरप्लेट हा खेळ इथल्या काही धनाढ्य शक्तींनी निर्माण केला आहे. रोसमेटा सेफ्टी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड (महेश मल्होत्रा), एफटीए एचएसआरपी सोल्युशन (सरल वर्मा) , रियल मॅझोन इंडिया लिमिटेड (बिस्वजीत मुखर्जी) या कंपन्यांनाच गोवा, ओरिसा, झारखंड अशा विविध राज्यांच्या नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. हे तिघेही मिळून इतकी दादागिरी करीत आहेत की दुसर्या कुणालाच सरकारी टेंडर प्रक्रियेत प्रवेश मिळू दिला जात नाही. कारण, टेंडर पूर्णतः मॅनेज केलेले असते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, या पैकी रोसमेटा या कंपनीला ओरिसाची ऑर्डर मिळालेली आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर राज्य आणि महाराष्ट्रातील नंबरप्लेटच्या किमतीत अंतर आहे. महाराष्ट्रातील किमंती जास्तीच्या का, सोन्याच्या नंबरप्लेट लावणार आहात का? हा पूर्णपणे फसवाफसवीचा प्रकार असून त्यातून महाराष्ट्राचे बाराशे कोटींचे नुकसान होणार आहे हे पैसे सरकारचे नसून गोरगरिबांच्या खिशातील आहेत.
रोसमेटा सेफ्टी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड (महेश मल्होत्रा), एफटीए एचएसआरपी सोल्युशन (सरल वर्मा) , रियल मॅझोन इंडिया लिमिटेड (बिस्वजीत मुखर्जी) या कंपन्यांच्या मागे जी नावे फिरत आहेत. ती नावे मालकांची नसून त्यांच्या नोकरांची आहेत. मूळ मालकांची नावे शहा, नागपाल देसाई अशी आहेत. महाराष्ट्रात इतक्या शिस्तबद्धपणे स्कॅम झाल्याचे आढळून येत नाही. संशय येण्याचे कारणच नाही कारण टेंडर लागलेय! पण, हे टेंडर बनविले कसे? अटी शर्ती कशा घातल्या? स्पर्धेतील इतर कंपन्यांना कसे बाद करण्यात आले, याचा शोध घेतला तर मात्र सर्वच उघड होईल.