इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणत असल्याचा भंडारे यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असलेल्या घुलेवाडी गावात सुरु असलेल्या कीर्तनाच्यावेळी काहीजणांनी राजकीय भाष्य करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्यानंतर संग्राम भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिस स्थानकात दाखल झाला.
याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजप अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले देखील सहभागी झाले. यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी लढाई नथुराम विरुद्ध तुकारामचीच असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या वाणीने हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली. पण आज संग्राम भंडारे सारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा अपमान करून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना,”बाळासाहेब थोरात आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा..!” असे म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत. गोडसे प्रवृत्तीची ही भाषा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.संत परंपरेतून मानवतेचा धर्म शिकवला जातो, द्वेषाची भाषा नाही.बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विरोधकांनीही नेहमी आदर केला आहे. त्यांना धमकी देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आव्हान आहे.
भाजपच्या राजकीय डावात, धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात कलह निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे. पण हा डाव राज्यातील वारकरी, पुरोगामी विचारवंत आणि सर्वसामान्य जनता उधळून लावेल,याची मला खात्री आहे. महाराष्ट्राची संत परंपरा ही प्रेम, सत्य आणि अहिंसेवर आधारलेली आहे. आम्ही गोडसे प्रवृत्तीचा निषेध करतो आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरद पवार) खंबीरपणे उभे आहोत, असा शब्द देतो असे त्यांनी म्हटले आहे.