जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तवरील पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेऊन निघाले. पोलिस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली. एखाद्या चित्रपटात पोलिस जसे उडी मारून लाथ मारतात, तशी Dysp कुलकर्णी यांनी भररस्त्यात लाथ मारली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पोलिस दाखल घेत नाहीत, असा या आंदोलकांचा आरोप आहे.
दरम्यान या प्रकारावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली, पण, स्वातंत्र्यदिनी आंदोलकांच्या कमरेत लाथ घातली. त्या पोलिस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता? हे मात्र समजू शकले नाही. तरीही अशी लाथ मारणे चुकीचेच…
तर आमदार रोहित पवार यांनी खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एकवेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करुनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कंबरेत DYSP अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा असे म्हटले आहे.