मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अभी यह फैशन चल गया है अंबेडकर अंबेडकर अंबेडकर नाम लेने का..! इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केले. त्यांनंतर या वक्तव्यावरुन आता पडसाद उमटू लागले आहे. विरोधी पक्ष आता या वक्तव्यावरुन आक्रमक झाला असून त्यांनी अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आपला संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला स्वर्ग काय असतो हे काय माहीत नाही. पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढले. मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली. त्यामुळे त्यांचे नाव फैशन म्हणून घेतले जात नाही. तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेऊन घेतले जाते. देवाचे नाव घ्यायचा अधिकार कुठे होता आम्हाला. तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवले होते अगदी स्पष्ट जे दिले ते भीमानेच.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच, आज मागासवर्गीय समाजातील लोकांना पंतप्रधान होता आलं, आदिवासी समाजातील व्यक्तींना राष्ट्रपती होता आलं, माझ्या सारख्या भारतातील तमाम SC, ST, OBC, समाजातील लोकांना मंत्री, खासदार, आमदार होता आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच या भारतातील तमाम नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल झाले. माणसाला माणूस म्हणून जगता आलं. त्यांच्या संविधानामुळेच या भारताची अखंडता टिकून राहिली, त्यांच्या संविधानामुळेच या देशाला समता-न्याय-बंधुत्वांची शिकवण मिळाली. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला “देवापेक्षा” कमी नाहीत..!
जय भिम..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!