इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी थेट आंदोलन केले. भुजबळांनी थेट हिवाळी अधिवेशनाला रामराम ठोकत नाशिक गाठले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा पहिल्या दिवस भुजबळांच्याच बातम्या सर्वाधिक होत्या.
या सर्व घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, आज छगन भुजबळसाहेबांकडे बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवार साहेबांसोबत छगन भुजबळसाहेब आले ; त्या दिवसापासून आदरणीय साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. भुजबळसाहेबांचा मानसन्मान हा पहिल्यांदा राखला जायचा.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, पहिले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ! छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे. १९८५ -९० च्या काळात पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच दिला होता. हा सगळा राजकीय प्रवास बघितल्यावर भुजबळांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात कोणाच्याही मनात शंका नसेल. आदरणीय साहेबांनी भुजबळांवर जेवढे प्रेम केले तेवढे कदाचित बाळासाहेबांनंतर कुणीही केले नसेल.
मला माहित नाही का, पण राहून राहून वाटतेय की, आदरणीय शरद पवार साहेबांसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता आजतरी महाराष्ट्रात नाही.