मुंबई (इंडिया दर्पण वृ्तसेवा) – बृहन्मुंबई महानगर पालिकेचा कारभार अनागोंदी पद्धतीने सुरू असल्याची टीका करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी BLACK LIST केलेल्या कंपनीला १५०० कोटीचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम दिल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, सन २०१६ साली बृहन्मुंबई महानगर पालिकेत निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे आरपीएस (RPS) या कंपनीला काळ्या यादीत (BLACK LIST) टाकण्यात आले होते. सन २०१६ च्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला होता. तसेच त्यांच्या दोन संचालकांना अटकही करण्यात आली होती. सन २०१६ ची बंदी २०१९ साली अचानक उठविण्यात आली. त्यामुळे बंदी असून, निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा ठपका असूनदेखील आरपीएसला महानगर पालिकेचे दरवाजे उघडण्यात आले.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने सिमेंट काँक्रिट रस्त्याचे दोन टेंडर फ्लोट केले आणि निकृष्ट दर्जाच्या कामासाठी शिक्षा देण्यात आलेल्या आरपीएसला १५००/- कोटींची कामे मिळाली. बृहन्मुंबई महानगर पालिकेचा कारभार अनागोंदी पद्धतीने सुरू आहे.