इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाण्यामध्ये येत्या काही दिवसांतच एक मोठा स्कॅम उघडकीस येणार आहे. महाराष्ट्र राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले असल्याचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. या ट्वीटनंतर दुसरे ट्वीटही त्यांनी केले आहे.
पहिल्या ट्वीट म्हटले आहे की, ३१ कोटी रूपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे. पण, राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे? अन् यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात येईल. जवळपास १०० एकर पेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्राॅड पोलिसांनी पकडलेले आहेत. ही जमीन कोणाची असेल, हे ठाण्यातल्या बिल्डर लॉबी ला हे ट्वीट वाचल्या-वाचल्या लगेच समजेल!
दुस-या ट्वीट म्हटले आहे की, ज्या जमिनीबाबत पहिले ट्वीट केले आहे, ती जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये असून तिथे दाट जंगल (झाडी) होती. ती झाडे कापण्यात आली असून आता त्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्तादेखील बनविण्यात आलेला आहे. मला हेच कळत नाही की, वनखात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीवरील झाडे कशी काय कापली जातात? १९९१ चा जो विकास आराखडा (Development plan) आहे, त्यामध्ये महानगरपालिकेनेही सदर परिसराची “दाट वनराईचा भाग” अशी नोंद केलेली आहे. म्हणजेच, ठाण्याला आता कुठलेच कायदे लागू होत नाहीत की काय? या मागे कोण आहे? याचाच आता तपास झाला पाहिजे की, कुठल्या मोठ्या राजकारण्याची हिमंत झाली; एवढे सगळे करून घेण्याची ! सर्वात महत्वाचे म्हणजे, एवढा गैरप्रकार सहन कसा करू शकतात अन् एवढे अवैध- बेकायदेशीर प्रकार होऊच कसे दिले जातात?