पुणे – दूरसंचार क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेत जी कंपनी चांगली ऑफर आणि सुविधा देते, त्याच कंपनीचे उत्पादने बाजारात चालतात. त्यातही ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या ऑफर मिळाल्या तर कंपन्यांची चांदीच असते. सध्या रिलायन्स जिओने स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. ग्राहक त्याला कसा प्रतिसाद देतात यावर त्याचे यश-अपयश अवलंबून असेल.
JioPhone नेक्स्ट या फोनचे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अनावरण करण्यात आले आहे. या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीतर्फे आपल्या वार्षिक बैठकीदरम्यान पहिल्यांदा Jio-Google आणि ‘JioPhone Next’ या स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली होती. हा अँड्रॉइड स्मार्टफोन १,९९९ रुपयांच्या एन्ट्री किंवा इफेक्टिव्ह किमतीवर मिळत आहे. ऑफरसोबत अनेक अटी आणि शर्ती जोडण्यात आल्या आहेत. त्या ऐकून तुमचा फोन खरेदी करण्याचा मूड बदलून जाईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा फोन ईएमआयवर तब्बल १५,७०० रुपयांपर्यंत मिळणार आहे. युजर्सना २ वर्षांपर्यंतचा डाटा आणि कॉलिंगचे टेन्शन राहणार नाही. याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
खरी किंमत इतकी
वास्तविक जिओफोन नेक्स्टची किंमत ६,४९९ रुपये आहे. याच किमतीत मायक्रोमॅक्स, आयटेल, सॅमसंग, नोकियासारख्या ब्रँडचे स्वस्त अँड्रॉइड फोन उपलब्ध आहेत. JioPhone Next ला पर्याय म्हणून Nokia 8110, Samsung Galaxy M01 Core, itel A26, Micromax iOne आदी उपलब्ध आहेत. आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे दिसण्यासाठी रिलायन्स जिओने ग्राहकांना ईएमआयचा पर्याय आणि बंडल डेटा ऑफर केला आहे. जिओ नेक्स्ट खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी चार ईएमआयचा प्लॅन सादर करण्यात आला आहे. या प्लॅनचे चार भाग आहेत. Always-On plan, Large plan, XL plan and XXL plan या प्लॅनचा समावेश आहे. हे ईएमआय प्लॅन डाटा आणि कॉलिंग बेनिफिटसह मिळतात.
हे आहेत ईएमआयचे प्लॅन
जिओफोन नेक्स्ट खरेदी करण्यासाठी चार ईएमआयचे पर्याय मिळत आहेत. ईएमआय प्लॅनअंतर्गत तुम्हाला शेवटी किती पैसे भरावे लागतील हे जाणून घेऊयात.
Always on plan – हा प्लॅन २४ महिन्यांसाठी ३०० रुपये प्रतिमहिना किंवा १८ महिन्यांसाठी ३५० रुपये प्रतिमहिना मिळत आहे. जर तुम्ही हे दोन्ही प्लॅन निवडले तर जिओ नेक्स्टची एकूण किंमत प्रत्येकी ९७०० रुपये आणि ८८०० रुपये असेल. त्यामध्ये ईएमआयची किंमत+ डाउन पेमेंट + ईएमआय प्रोसेसिंग (५०१ रुपये) शुल्काचा समावेश आहे.
Large plan – हा प्लॅन २४ महिन्यांसाठी ४५० रुपये प्रतिमहिना किंवा १८ महिन्यांसाठी ५०० रुपये प्रतिमहिना मिळत आहे. म्हणजेच तुम्ही दोन प्लॅन निवडत असाल तर जिओ फोन नेक्स्टची एकूण किंमत प्रत्येकी १३,३०० रुपये आणि ११,५०० रुपये असेल. (त्यामध्ये ईएमआय+ डाउन पेमेंट+ ईएमआय प्रोसेसिंग (५०१ रुपये) चा समावेश आहे.
XL plan – हा प्लॅन २४ महिन्यांसाठी ५०० रुपये प्रतिमहिना किंवा १८ महिन्यांसाठी ५५० रुपये प्रतिमहिना मिळतो. जर तुम्ही हे दोन्ही प्लॅन निवडत असाल तर जिओफोन नेक्स्टची एकूण किंमत १४५०० रुपये आणि १२४०० रुपये असेल. (यामध्ये ईएमआयची किंमत+ डाउन पेमेंट + ईएमआय प्रोसेसिंग (५०१ रुपये) शुल्काचा समावेश आहे.
XXL plan – हा प्लॅन २४ महिन्यांसाठी ५५० रुपये प्रतिमहिना किंवा १८ महिन्यांसाठी ६०० रुपये प्रतिमहिना मिळत आहे. म्हणजेच दोन्ही प्लॅन निवडल्यानंतर जिओफोन नेक्स्टची एकूण किंमत प्रत्येकी १५,७०० रुपये आणि १३३०० रुपये (यामध्ये ईएमआयची किंमत + डाउन पेमेंट+ ईएमआय प्रोसेसिंग (५०१ रुपये) शुल्काचा समावेश आहे.