विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतातील ४जी सेवेबाबत दूरसंचार नियामक आयोग (ट्राय)ने महत्त्वाची माहिती दिली आहे. डाऊनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओ तर अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन अव्वल असल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे.
रिलायन्स जिओ दर सेकंदाला २०.१ मेगाबाईट डाउनलोड स्पीडसह ४ जी स्पीड चार्टमध्ये अव्वल आहे, तर एप्रिलमध्ये ७.७ एमबीपीएस अपलोड स्पीड नोंदवून व्होडाफोनने बाजी मारली आहे, अशी माहिती दूरसंचार नियामक ट्राय यांनी दिली आहे.
जिओचा जवळचा प्रतिस्पर्धी व्होडाफोनच्या तुलनेत डाउनलोड गती जवळजवळ तीन पट जास्त आहे. व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलरने आपला मोबाइल व्यवसाय व्होडाफोन आयडिया लिमिटेड म्हणून विलीन केला असला तरी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) अजूनही दोन्ही घटकांचा वेगळा नेटवर्क स्पीड नोंद करतो.
११ मे रोजी अद्ययावत करण्यात आलेल्या ट्रायच्या आकडेवारीनुसार व्होडाफोनने एप्रिलमध्ये ७ एमबीपीएस डाउनलोड स्पीड नोंदविला आहे. त्यानंतर आयडिया आणि भारती एअरटेल अनुक्रमे ५.८ एमबीपीएस आणि ५ एमबीपीएस डाउनलोड स्पीड नोंदविला. ६.७ एमबीपीएससह व्होडाफोन अपलोड विभागात चार्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ आयडिया ६.१ एमबीपीएस, जियो ४.२ एमबीपीएस आणि एअरटेल ३.९ एमबीपीएस स्पीड नोंदविला गेला.
डाउनलोड स्पीड ग्राहकांना इंटरनेटवरून सामग्रीमध्ये प्रवेश करण्यात मदत करते, तर अपलोड गती त्यांना त्यांच्या संपर्कांवर चित्रे आणि व्हिडिओ पाठविण्यात किंवा शेअर करण्यास मदत करते. रिअल-टाइम सह मायस्पीड अँप्लिकेशनच्या साहाय्याने संपूर्ण भारतभरात संकलित केलेल्या डेटाच्या आधारे सरासरी वेगाची गणना केली जाते.