इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतातील करदात्यांसाठी टॅक्स फाइलिंग आणि आर्थिक नियोजन आता अधिक सोपे होणार आहे. जिओ-फायनान्स अॅपने टॅक्स फाइलिंग आणि टॅक्स व्यवस्थापनाची सुविधा देणारा एक मॉड्यूल लाँच केला आहे. फक्त २४ रुपयांपासून सुरू होणारे हे मॉड्यूल्स जिओ-फायनान्स अॅपवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. जिओ-फायनान्सने हा नवा फीचर ‘टॅक्सबडी’च्या भागीदारीत विकसित केला असून, ‘टॅक्सबडी’ ही ऑनलाइन टॅक्स फाइलिंग आणि सल्ला देणारी सुप्रसिद्ध सेवा आहे.
या मॉड्यूलमध्ये दोन प्रमुख सुविधा आहेत – टॅक्स प्लॅनर आणि टॅक्स फाइलिंग. टॅक्स फाइलिंग सुविधा जुन्या आणि नव्या करप्रणालींमधील गोंधळ दूर करण्यासाठी तयार केली आहे. ही सुविधा ग्राहकांना 80C व 80D सारख्या कलमांनुसार कराची गणना करून कर-बचत करण्यात मदत करते. हे वापरण्यास सोपे व परवडणारे आहे तसेच महागड्या मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करते.
दुसरी सुविधा आहे – टॅक्स प्लॅनर, जी भविष्यातील करदायित्वाचा अंदाज घेऊन ते कमी करण्यास मदत करते. या मॉड्यूल अंतर्गत वापरकर्ता स्वतः रिटर्न दाखल करू शकतो किंवा तज्ज्ञांच्या मदतीने फाइलिंगचा पर्याय निवडू शकतो. अॅपवर स्व-फाइलिंग मॉड्यूलची सुरुवात २४ रुपयांपासून तर टॅक्स एक्स्पर्टच्या मदतीने फाइलिंगची सुरुवात ९९९ रुपयांपासून होते.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ हितेश सेठिया म्हणाले, “टॅक्स भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना, आमचे उद्दिष्ट टॅक्स फाइलिंगशी संबंधित सर्व गुंतागुंती दूर करणे आहे. तसेच ग्राहकांना प्रभावी टॅक्स प्लॅनिंग सेवा देणे तितकेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते संपूर्ण आर्थिक वर्षभर आपले करदायित्व अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतील. या मॉड्यूलच्या लाँचमुळे परवडणारी, डिजिटल-फर्स्ट आर्थिक समाधानं देण्याच्या आमच्या प्रयत्नांना एक नवा आयाम मिळाला आहे.”
अॅपच्या माध्यमातून वापरकर्ते आयटीआर दाखल केल्यानंतर रिटर्नची स्थिती तपासू शकतात, रिफंड ट्रॅक करू शकतात आणि कोणत्याही टॅक्स-संबंधित नोटिसचा अलर्ट मिळवू शकतात. मॉड्यूलमध्ये उत्पन्नाची नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे आणि योग्य करप्रणाली निवडणे यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोपी असून प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना मार्गदर्शन केले जाते.