नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आधीपेक्षा उत्तम वित्तीय सेवा देण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (जेएफएसएल) ने आपले पूर्णतः विकसित जिओफायनान्स अॅप लॉन्च केले आहे. जिओफायनान्स अॅपचे बीटा व्हर्जन सुमारे ४ महिने आधी ३० मे, २०२४ रोजी लॉन्च केले गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत 60 लाख उपभोक्त्यांनी हे डाउनलोड केले आहे. कंपनीचा दावा आहे की, ग्राहकांच्या फीडबॅकच्या आधारावर नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. नवीन अॅप गुगल प्ले स्टोर, अॅपल अॅप स्टोर आणि मायजिओमधून डाउनलोड करता येईल.
कंपनीने आपल्या फायनान्शियल प्रॉडक्ट चेनमध्ये अनेक नवीन सेवा जोडल्या आहेत. यामध्ये म्युच्युअल फंडवर कर्ज, मालमत्तेवर कर्ज, गृहकर्ज आणि गृहकर्ज बॅलन्स ट्रान्स्फरचा समावेश आहे. फायनान्शियल बाजारपेठेत स्थिरता मिळवण्यासाठी कंपनी स्पर्धात्मक दरांवर कर्ज उपलब्ध करून देईल.
कंपनीच्या मते, जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड (जेपीबीएल) मध्ये सुमारे 15 लाख ग्राहकांनी बचत खाते उघडले आहे. बँकेत बचत खाते फक्त 5 मिनिटांत डिजिटली उघडले जाऊ शकते. खात्यासोबत डेबिट कार्डही मिळेल आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमुळे बचत खाते अधिक सुरक्षित असेल. याशिवाय, यूपीआय पेमेंट, मोबाइल रिचार्ज आणि क्रेडिट कार्ड बिलांच्या पेमेंटसारख्या सेवा देखील ग्राहकांना उपलब्ध असतील.
जिओफायनान्स अॅपमध्ये ग्राहकांचे विविध बँक खाते आणि त्यांची म्युच्युअल फंड होल्डिंग्ज लिंक करता येऊ शकतात. याशिवाय, जिओफायनान्स अॅप जीवन विमा, दुचाकी आणि वाहन विमा यासारख्या अनेक सेवा देत आहे. जेएफएसएल, आंतरराष्ट्रीय फंड ब्लॅकरॉकसोबत भागीदारी करून ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचे, नविन इन्व्हेस्टमेंट सोल्यूशन आणण्याच्या दिशेने काम करत आहे.
जेएफएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हितेश सेठिया यांनी सांगितले, “जेएफएसएलमध्ये आमचे मिशन म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन निर्बाध आणि सोयीस्कर वित्तीय सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. नवीन जिओफायनान्स अॅप भारतात तयार झाले आहे आणि लवकरच येणाऱ्या अनेक नवीन वैशिष्ट्यांसह, आम्ही भारतातील लोकांसाठी एक विश्वासार्ह वित्तीय सहकारी होण्याच्या दिशेने पुढे जात आहोत.”