विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओचे सर्व्हर डाऊन असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे युजर्सना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जिओ वतीने जिओ सर्व्हर डाउन असल्याची माहिती मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरद्वारे नागरिकांना दिली जात आहे. विशेष म्हणजे सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम आदी सारख्या सोशल मीडियामध्ये समस्या निर्माण झाल्याने ते बंद पडले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी अशी स्थिती उद्भवल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.
मोबाईल वापरकर्ते तक्रार करत आहेत की, त्यांना सकाळपासून जिओचे नेटवर्क मिळत नाही. यामुळे वापरकर्ते इनकमिंग किंवा आउटगोइंग कॉल करू शकत नाहीत. यासह, त्यांना इंटरनेट डेटा वापरातही समस्या येत आहे. त्याच वेळी जिओ सर्व्हर डाऊन ‘डाऊनडेटेक्टर’ वेबसाइटवरून देखील याबाबत सांगितले जात आहे, इंटरनेटवरील आऊटेजच्या अहवालांवर ते लक्ष ठेवते. डाउनडेटेक्टरच्या मते, भारतात जिओ मोबाईलचे नेटवर्क वापरण्यात समस्या आहे. नेटवर्क डाऊन झाल्याबद्दल वापरकर्त्यांकडून वारंवार तक्रारी येत असून जिओ सर्व्हर डाऊन झाल्याची बरीचशी माहिती दिल्ली, लखनौ, ग्वाल्हेर, इंदूर, रायपूर, बंगळूरू, मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमधून येत आहे. आतापर्यंत, ट्विटरवरील सुमारे ४ हजार वापरकर्त्यांनी जिओ नेटवर्क बंद झाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवार दि. ४ रोजी रात्री काही तास फेसबुक , त्याचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉसअॅप आणि फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम बंद असल्यामुळे युजर्समध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण, तब्बल सात तास बंद राहिल्यानंतर या सर्व्हिसेस पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. फेसबुक सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातील लोक यामुळे प्रभावित झाले होते. सेवांमध्ये प्रवेश पुनर्संचयित करण्यासाठी काम करत असल्याचे फेसबुकतर्फे सोमवारी रात्री उशिरा सांगण्यात आले होते. त्यानंतर सदर कंपनीने या सेवा बंद झाल्यामुळे लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमा मागितली आणि अॅप परत येण्यासाठी इतकी वेळ प्रतीक्षा केल्याबद्दल युजर्सचे आभार देखील मानले होते .