विशेष प्रतिनिधी, मुंबई
रिलायन्स जिओ नवीन अत्याधुनिक फोन आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाँच करण्यात येणार होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे आता या फोनची लॉन्चिंग येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार आहे त्यामुळे काही ग्राहकांचा थोडा विरस झाला तरी या फोन बाबत उत्सुकता कायम आहे. जिओफोन नेक्स्ट लॉन्च रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त आगामी फोन जिओफोन नेक्स्ट रोलआउट दिवाळीपूर्वी सुरू होईल, रिलायन्स जिओने याबाबत गुरुवारी उशिरा घोषणा केली. यापुर्वी कंपनीने जून मध्ये जाहीर केले होते की सर्व ग्राहकांना परवडणारा नवीन जिओ फोन हा गणेश चतुर्थीला म्हणजेच दि. १० सप्टेंबर रोजी लाँच केला जाईल, परंतु आता हा स्मार्टफोन सध्या प्रगत चाचण्यांमध्ये असल्यामुळे दिवाळीला ४ नोव्हेंबर रोजी लाँच केला जाईल.
बहुप्रतिक्षित जिओफोन नेक्स्ट, रिलायन्स जिओने गुगलने सह विकसित केलेला या अल्ट्रा- 4G स्मार्टफोनची सर्वांना उत्सुकता आहे. कंपनीने जिओफोन नेक्स्ट फोनसाठी विशिष्ट किंमत जाहीर केली नसली तरी, याची किंमत सुमारे ३,४९९ रुपये असू शकते. जिओ फोन नेक्स्टमध्ये डिव्हाइस आणि ऑपरेटिंग सिस्टम अधिक शक्तिशाली क्षमता असतील. तसेच स्पष्ट आवाजासह- सुपर कॅमेरा आदि नवीनतम वैशिष्ट्ये आणि सुरक्षा यात असेल . दरम्यान, या फोनची सध्या मर्यादित वापरकर्त्यांसह चाचणी केली जात असून दिवाळीपर्यंत ते मोठ्या प्रमाणावर आणले जाईल. सध्या सेमीकंडक्टरची कमतरता असून ती एक जागतिक समस्या बनली आहे त्यामुळे स्मार्टफोनपासून ऑटोमोबाईलपर्यंत व्हिडिओ गेम कन्सोलपर्यंत अनेक उद्योगांवर परिणाम होत आहे. तसेच स्मार्टफोनला विलंब होण्याचे हे एक मुख्य कारण आहे.
जिओने आगामी स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती दिलेली नाही, परंतु काही तपशील उघड झाले आहेत. रिलायन्स जिओ फोन 4G नेटवर्कवर काम करत आहे. तसेच यात रीड अलाऊड आणि ट्रान्सलेट नाऊ ही वैशिष्ट्ये असतील. हा फोन गुगल प्ले आणि भारतातील विशिष्ट स्नॅपचॅट लेन्ससह प्रीलोड केला जातो. याशिवाय फोनच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला एकच कॅमेरा आहे. याला 5.5-इंच डिस्प्ले असू शकतो. फोन क्वालकॉम क्यूएम २१५ एसओसी आणि २५०० एमएएच बॅटरी, ड्युअल-सिम सपोर्ट आणि १६ जीबी किंवा ३२ जीबी स्टोरेज पर्यायांसह देण्यात येऊ शकतो.