इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमेरिकेची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी टी-मोबाईलला मागे टाकून रिलायन्स जिओ लवकरच जगातील सर्वात मोठी फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) सेवा पुरवणारी कंपनी बनू शकते. सरळ भाषेत सांगायचं झालं, तर घरांमध्ये व ऑफिसेसमध्ये मिळणाऱ्या वाई-फाय सेवा म्हणजेच FWA सेवा होय. ICICI सिक्युरिटीजने रविवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात सांगितले की जून २०२५ पर्यंत रिलायन्स जिओकडे जगात सर्वाधिक FWA ग्राहक असण्याची शक्यता आहे.
टी-मोबाईलच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२५ मध्ये त्यांच्या FWA ग्राहकांची संख्या सुमारे ६८.५ लाख होती. त्याचवेळी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मे २०२५ मध्ये रिलायन्स जिओच्या FWA ग्राहकांची संख्या ६८.८ लाखांहून अधिक झाली होती. अर्थातच टी-मोबाईलने देखील त्यानंतर काही नवीन ग्राहक जोडले असतील, परंतु रिलायन्स जिओची ग्राहक वाढीची गती त्यापेक्षा खूप जास्त आहे.
मे महिन्यात जिओने सुमारे ७.५ लाख नवीन FWA ग्राहक आपल्या नेटवर्कमध्ये जोडले. ICICI सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, जिओ ज्या वेगाने ग्राहक जोडत आहे, त्या वेगाने चालू राहिल्यास जून २०२५ मध्ये ती टी-मोबाईलला मागे टाकेल.
भारतामध्ये सध्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन कंपन्याच FWA सेवा देत आहेत. मे महिन्यात एअरटेलने सुमारे १.८२ लाख नवीन FWA ग्राहक जोडले असून, त्यांच्या एकूण ग्राहकांची संख्या आता १५.४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडिया सध्या FWA सेवा देत नाही.