नाशिक -कोरोनाबाधितांवर अत्यंत तातडीच्या उपचारासाठी टोसिलीझुमॅब आणि म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी ॲम्फोटेरेसीन बी. इंजेक्शन हे औषध अत्यंत तातडीच्या उपचारासाठी आवश्यक असते. संबंधित रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचा योग्य अभ्यास करून ते दिले जाणे अनिवार्य आहे. या इंजेक्शनच्या वितरणामध्ये कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ जाऊ नये व औषध रूग्णालयाला अतीतातडीने उपलब्ध व्हावे या दृष्टीने नाशिक महानगरपालिका, मालेगांव महानगरपालिका व नाशिक ग्रामीण या तीन भागातील सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत हे इंजेक्शनस उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय आदेशान्वये दिली आहे.
या संदर्भात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तथा इंजेक्शन वितरणाचे घटनाव्यवस्थापक डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी जारी केलेल्या शासकीय पत्रकात नमुद केले आहे की, टोसिलीझुमॅब व ॲम्फोटेरेसीन बी. इंजेक्शनसच्या वितरणामध्ये कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ जाऊ नये व औषध रूग्णालयाला अतीतातडीने उपलब्ध होण्यासाठी तीन भागातील सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि मालेगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी मालेगांव महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.
ज्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत त्या रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांनी वरील इंजेक्शनस वर नमूद सक्षम अधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यामध्ये आवश्यक माहिती सादर करून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. या पद्धतीने बहुतांशी रुग्णालय कार्यवाही करीत आहेत परंतु काही वैद्यकीय व्यावसायिक रुग्णांना किंवा त्यांचे नातेवाईक यांना वरील इंजेक्शनकरीता प्रिस्क्रीपशन लिहून देत आहेत व कोणत्याही पद्धतीने वरील इंजेक्शनस आणून देण्याबाबत सक्ती करीत आहेत. ही बाब आपती व्यवस्थापन कक्षाने वितरणासाठी आखून दिलेल्या पद्धतीचे उल्लंघन करणारी आहे. तरी वरील कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करण्यात यावे. तसेच या कार्यपद्धतीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याससं बंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गंभीर कारवाई करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. अंतुर्लीकर यांनी कळविले आहे.