नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषद, नाशिक अधिनस्त गट-क चे विविध संवर्गातील पदांचे पदभरती करीता दि.05/08/2023 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने ऑक्टोबर 2023 ते जुलै 2024 या दरम्यान ibps संस्थेने घेतलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल जिल्हा परिषद, नाशिक कार्यालयास प्राप्त झाला असून सदर निकालाचे अनुषंगाने जलज शर्मा, अध्यक्ष, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, नाशिक व डॉ. अर्जुन गुंडे, सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक (गट-क) या संवर्गाची नॉन पेसा (बिगर आदिवासी क्षेत्र) मधील उमेदवारांची प्रारूप निवड व प्रारूप प्रतिक्षा यादी दि. 14.08.2024 पासून जिल्हा परिषद, नाशिकचे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून पुढील आठवड्यात प्रारूप निवड व प्रारूप प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच पेसा क्षेत्र (आदिवासी क्षेत्रातील) 08 पदांची प्रारूप निवड यादीबाबत शासनाकडुन मार्गदर्शन मिळाल्यानंतर लवकरच जिल्हा परिषद, नाशिकचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
तसेच यापुर्वी आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (ऊ.श्रे.), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण) या 07 संवर्गात सामाजिक/समांतर आरक्षण व गुणानुक्रमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रारुप निवड यादी व प्रतिक्षा यादीनुसार उमेदवारांचे मुळ कागदपत्रांची तपासणी झाली असून अंतिम निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मा.अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी, नाशिक यांचे अध्यक्षेतेखाली निवड समितीची बैठकीचे आयोजन दि.16.08.2024 रोजी करण्यात आले असुन सदर याद्या अंतिम करुन लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
यास्तव प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) औषध निमार्ण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संवर्गातील प्रारूप निवड व प्रारूप प्रतिक्षा निवड झालेल्या उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी करण्यात आली असुन जे उमेदवार कागदपत्र तपासणीसाठी गैरहजर होते त्या उमेदवारांना दुबार संधी देवुन पुढील तारखा देण्यात आलेल्या असुन सदर याद्या अंतिम करण्याची कारवाई सुरू आहे.
तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (पुरूष) 40 टक्के, आरोग्य सेवक (पुरूष) 50 टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक (महिला) व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाचे निकाल अदयाप जिल्हा परिषद, नाशिक ला प्राप्त झालेले नसुन सदर संवर्गाचे निकाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशी जिल्हा परिषद, नाशिक प्रशासनाचे वतीने रवींद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद, नाशिक यांनी माहिती दिली.