पालकर व अष्टेकर यांना चौकशीसाठी बोलावण्याचे खांडवी यांचे आदेश..
नाशिक – मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांना धर्मदाय आयुक्त यांचेकडून मिळालेली जमिन विक्री केल्याच्या तथाकथित आरोपावरून सोशल मिडियावर संभाषण संवाद प्रसारीत केल्या प्रकरणी आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी शैलेश पालकर ( पोलादपूर जिल्हाध्यक्ष.रायगड) व प्रशांत अष्टेकर (मुंबई ) यांचे विरोधात मालेगाव शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.
याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांना मा.धर्मदाय आयुक्त यांनी रायगड जिल्ह्यात जमिन दिली व ती त्यांनी परस्पर विकून पैसे हडप केले,असे आरोप करणारे संभाषण शैलेश पालकर व प्रशांत अष्टेकर यांनी भ्रमणध्वनीवर केले व ती संभाषण ध्वनी राज्यातील अनेक ग्रुपवर प्रसारीत केली. वास्तविक धर्मदाय आयुक्त यांनी अशाप्रकारे कुठलीच जमिन एस.एम.देशमुख यांना दिलेली नाही. त्यामुळे ती परस्पर विकण्यासाठी विषय नाही.असे असतांना केवळ एस.एम.देशमुख यांना अशा खोट्या आरोपावरून राज्यभर बदनाम करण्याचा प्रयत्न उपरोक्त “जोडगोळी”ने केला आहे.
एस.एम.देशमुख हे राज्यातील तमाम पत्रकार बांधवांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे.त्यांना बदनाम करुन मराठी पत्रकार परिषदेच्या हजारो सभासदांचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आज यशवंत पवार यांचे नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व फिर्यादही दाखल केली. दरम्यान,अप्पर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी फिर्याद दाखल करत मालेगाव शहर पोलीस निरीक्षक यांना पालकर व अष्टेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे व त्यांचेवर गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले. जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे,सरचिटणीस रमेश देसले,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विनायक माळी,तालुकाध्यक्ष चेतन महाजन व खजिनदार राजेश सूर्यवंशी उपस्थित होते.