नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्येही राजकीय सकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने आमदारांमध्ये फूट पडत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत पडलेल्या फुटीपासून शिकवण घेत महाआघाडीच्या आमदारांना काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये नेण्यात आले आहे. मात्र, या आमदारांबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच झामुमोचे काही आमदार गेलेले नाहीत.
रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. यूपीएच्या ३२ आमदारांसह ३५ नेते रांची विमानतळावरुन विशेष विमानाने रायपूरकडे रवाना झाले आहेत. यात सत्ताधारी झामुमोचे १९ काँग्रेसचे १२ व राजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. याबरोबरच काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर व संतोष पांडेय यांचाही यात समावेश आहे. महाआघाडीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
रायपूरमध्ये मेफेअर गोल्ड रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. हॉटेलला हाय सिक्युरिटी झोन जाहीर करण्यात आले आहे. तेथे एक डीएसपी व दोन पोलिस निरिक्षकांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तथापि, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या रांचीमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याबाबत गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.
हवाईमार्गे छत्तीसगढला नेण्याची चर्चा
यूपीए आमदारांना हवाईमार्गे छत्तीसगढला नेण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, तीन बसमधून यूपीए आमदारांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबरोबर खुंटी जिल्ह्यातील लतरातू धरणावर नेण्यात आले होते. खुंटी, नेतरहाटमार्गे हे सर्व आमदार छत्तीसगढमध्ये जातील अशी चर्चा होती. परंतु, त्यावेळी तसे न होता मंगळवारी आमदारांना हवाईमार्गे नेण्यात आले. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी आमदार राज्याबाहेर जात आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Jharkhand Political Crisis
CM Hemant Soren Alliance MLA Raipur