रांची (झारखंड) – पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने आपल्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. गरीब असलेल्या बाइक आणि स्कूटरधारकांना सरकारकडून पेट्रोल २५ रुपये प्रतिलिटर स्वस्त देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारक ग्राहकांना दर महिन्यात कमाल १० लिटर पेट्रोलचा लाभ होणार आहे. पेट्रोलपंपांवर त्यांना पूर्ण पैसे अदा करावे लागणार असून, राज्य सरकारकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या माध्यमातून अनुदानाची रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. आकडेवारीनुसार झारखंडमध्ये शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या ५९ लाख आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले, की पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे. त्यामुळे गरिब आणि मध्यम वर्गातील नागरिक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. त्यामुळे सरकारने राज्य स्तरावर दुचाकीचालकांना पेट्रोल प्रतिलिटर २५ रुपये स्वस्त देऊन दिलासा देणार आहे. त्याचा लाभ २६ जानेवारी २०२२ पासून मिळणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी दुचाकीत पेट्रोल भरल्यावर राज्य सरकार प्रति महिना १० लिटरपर्यंत पेट्रोल २५ रुपये प्रतिलिटर म्हणजेच २५० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.
दुसऱ्या राज्यांवर वाढला दबाव
झारखंड सरकारच्या या निर्णयामुळे देशातील इतर राज्यांमध्येही अशाप्रकारची मागणी होऊ शकते. इंधनदरवाढीमुळे गरिब नागरिकांवर सर्वाधिक परिणाम होत असून त्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मागास नागरिक दुचाकींचा वापर अधिक करतात. या निर्णयाच्या माध्यमातून झारखंड सरकारने या नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.