इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अवैध खाणकाम प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सोरेन यांचे जवळचे सहकारी आणि झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) नेते पंकज मिश्रा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. या छाप्यात ईडीला सोरेन यांचे बँक पासबुक, स्वाक्षरी केलेले आणि स्वाक्षरी नसलेले चेकबुक जप्त करण्यात आले आहे. राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मिश्रा हा मुख्य आरोपी असल्याचे ईडीने म्हटले आहे.
मिश्रा यांना १९ जुलै रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीखाली अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात मिश्राशिवाय त्यांचे सहकारी बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांना आरोपी करण्यात आले आहे. दोघांना अनुक्रमे ४ आणि ५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
साहिबगंज जिल्ह्यातील एफआयआरच्या आधारे ८ मार्च रोजी कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मिश्रा आणि इतरांविरुद्ध ईडीने तपास सुरू केला होता. १६ सप्टेंबर रोजी ईडीने विशेष पीएमएलए कोर्टासमोर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात नमूद केले आहे की, झामुमोचे माजी कोषाध्यक्ष रवी केजरीवाल यांचा जबाब नोंदवला होता. ज्यांनी सांगितले की त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मिश्रा यांना “संथाल परगणा येथून दगड आणि वाळू खाण व्यवसायातून येणारा पैसा थेट प्रेम प्रकाश यांच्याकडे सोपवावा” असे निर्देश दिले होते.
२४ ऑगस्ट रोजी रांचीमध्ये छापेमारी करताना प्रकाश यांच्या घरातून झारखंड पोलिसांनी दोन एके-४७ जप्त केल्या होत्या. सोरेन हे सध्या खाण लीज वाटप केल्याबद्दलच्या प्रकरणाला सामोरे जात आहेत. निवडणूक आयोगाने सोरेन यांना अपात्र ठरवणाऱ्या याचिकेवर राज्यपाल रमेश बैस यांना आपला अहवाल ऑगस्टमध्ये पाठविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही आयोगाने मत सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.
सोरेन यांचे सचिव विनय चौबे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याच वेळी, त्यांचे मीडिया सल्लागार अभिषेक प्रसाद यांनी ईडीच्या आरोपपत्रासंदर्भात केलेल्या कॉल आणि संदेशांना प्रतिसाद दिला नाही. झामुमोचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले की, पक्ष विचाराधीन विषयावर भाष्य करणार नाही. आरोपपत्रानुसार, ८ जुलै रोजी साहिबगंज जिल्ह्यातील मिश्रा यांच्या निवासस्थानावर ईडीच्या छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सोरेन यांच्या बँक पासबुकचा समावेश आहे.
“एक पासबुक आणि दोन चेक बुक्स असलेला एक सीलबंद लिफाफा आहे. ज्यामध्ये दोन स्वाक्षरी केलेले चेक आहेत- 004718 आणि 004719,” असे आरोपपत्रात म्हटले आहे. याशिवाय ३१ कोरे धनादेश ज्यांचे क्र. 005720 ते 004750 आहेत. हे सर्व धनादेश बँक ऑफ इंडिया, गंगाप्रसाद शाखा, साहिबगंज शाखेचे आहेत. हे सर्व धनादेश हेमंत सोरेन यांच्या नावाने खाते क्रमांक 5932xxxxxxxxxxx चे आहेत.’ ईडीने वरील तीन आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी ४३ साक्षीदारांची यादी आणि त्यांच्या नोंदवलेल्या जबाबांची यादीही दिली आहे.
Jharkhand CM Hemant Soren Cheque book and bank passbook