नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी तथा भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. हे विमानतळ आशिया खंडातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त राहणार आहे. हे विमानतळ गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर येथे आहे. ते दिल्लीपासून अवघे ८o किमी अंतरावर आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा १०,०५० कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे. या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ १ लाखांहून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे.
देशाच्या विकासाला मदत
जेवर विमानतळ १३०० हेक्टर जमिनीवर होणार असून त्याचा पहिला टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण होईल. वर्षाला सुमारे १२ लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. चारही टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता वाढून ७० लाख प्रवासी होणार आहे. सुरुवातीला जेवर विमानतळावर दोन हवाई पट्ट्या कार्यरत असतील. या विमानतळाच्या विकासाचे कंत्राट झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनलला देण्यात आले आहे. या विमानतळामुळे देशाच्या विकासाला मदत होणार आहे.
उत्तर प्रदेशातील पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामामुळे उत्तर प्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे भारतातील एकमेव राज्य बनेल. तामिळनाडू आणि केरळ येथे प्रत्येकी ४ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. यापुर्वी कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. तसेच अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. आता नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गर्दी कमी होण्यास मदत होईल.
मेट्रो सेवेने जोडणार
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सेंटर विकसित केले जाईल, यामध्ये मल्टी-मॉडल ट्रान्झिट सेंटर, मेट्रो आणि हायस्पीड रेल्वेसाठी स्टेशन, टॅक्सी, बस सेवा आणि खाजगी वाहन पार्किंग सुविधा असेल. तसेच मेट्रो सेवेद्वारे विमानतळही जोडले जाणार आहे. यासह यमुना एक्सप्रेस वे, वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे देखील विमानतळाशी जोडले जाणार आहेत.
A glimpse of #NoidaInternationalAirport | @jewar_airport
Watch pic.twitter.com/wYbuJT4Vnr— jewar Airport (@jewar_airport) November 23, 2021
दिल्लीपासून २१ मिनिटांचे अंतर
जेवर विमानतळाला प्रस्तावित दिल्ली-वाराणसी हायस्पीड रेल्वेने जोडण्याची योजना आहे, त्यानंतर दिल्ली आणि विमानतळादरम्यानचा प्रवास फक्त २१ मिनिटांचा असेल. याशिवाय विमानतळावर देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंग सेवाही असतील. विमानतळाची रचना करताना, ऑपरेटिंग खर्च कमी करण्याची आणि प्रवाशांची सुरळीत आणि जलद वाहतूक सुलभ करण्याची काळजी घेण्यात आली आहे.
प्रदुषण नसलेले पहिले विमानतळ
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले प्रदुषण शून्य असेल. विमानतळाचा काही भाग प्रकल्पाच्या जागेवरून काढण्यात येणारी झाडे दुसरीकडे लावण्यासाठी वापरला जातील. पहिल्या टप्प्यासाठी भूसंपादन आणि बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाशी संबंधित काम पूर्ण झाले आहे.