विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता नीट (नॅशनल एलिजिबिलीटी कम एंट्रन्स टेस्ट) आणि जेईई (ज्वाइंट एंट्रन्स एक्झाम) मेन्स सारख्या स्पर्धा परीक्षा रद्द करण्याचा दबाव केंद्र सरकारवर वाढला आहे. परंतु नीट आणि जेईई मेन्सच्या परीक्षा रद्द होणार नाही, असे स्पष्ट संकेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात नीट आणि जेईई मेन्स संबंधित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेतही नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिले आहेत.
शिक्षण मंत्रालय आणि एनटीएच्या सूत्रांनुसार, नीट आणि जेईई मेन्स परीक्षा घेण्याबाबत पीएमओकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे परीक्षेच्या तयारीला वेग आला आहे. देशात बहुतांश राज्यांत बोर्डाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. आंतरिक आकलनानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रतिष्ठीत स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेश परीक्षेविना विद्यार्थ्यांची निवड करणे अनुचित ठरेल, असे शिक्षण मंत्रालयाचे मानने आहे. त्यातून अनेक प्रकारचे नवे प्रश्न उद्भवतील. दिल्लीसह देशातील इतर राज्यांत कोरोनाची परिस्थिती वेगाने सुधरत असल्याने तसेच लॉकडाउन हटविला जात असल्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालय उत्साहित आहे.
केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रस्तावित संयुक्त प्रवेश परीक्षासुद्धा या वर्षीपासून घेण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याची शिफारस करण्यात आली होती. त्या नंतर मंत्रालयाकडून नव्या शैक्षणिक वर्षापासून ही शिफारस लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे याच्या तयारीवर परिणाम झाला आहे. परंतु आता त्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे. याने दोन उद्देश पूर्ण होणार आहेत. पहिले म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणातील एक मोठी शिफारस निर्धारित मुदतीत लागू करण्याचे लक्ष्य पूर्ण होईल. आणि दुसरे म्हणजे प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत पूर्ण न्याय मिळू शकेल तसेच प्रवेशासाठी भटकंती थांबेल.