नवी दिल्ली – कोरोनाच्या देशातील वाढत्या प्रादुर्भावामुळे जेईई मेन्स परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. सीबीएसईने इयत्ता १०वीची परीक्षा रद्द करुन इयत्ता १२वीची परीक्षा पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र बोर्ड व आयसीएसईनेही १०वी व १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे आता जेईई मेन्स परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आली आहे. परीक्षेपूर्वी १५ दिवस आधी तारखा घोषित करण्यात येतील, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. nta.nic.in आणि एनटीए जेईईचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in यावर विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. एनटीएतर्फे जेईई मेन एप्रिल सत्र ३ पेपर १ (बीई. टेक.) साठी परीक्षेचे आयोजन केले जाणार होते. ही परीक्षा २७ एप्रिल, २८, २९ आणि ३० एप्रिलला घेतली जाण्याचे नियोजित होते. ही परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाणार होती. त्यानुसार, पहिली परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार होती. अखेर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.