नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सामान्य नागरिकांची कामे करण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उमेद मॉल सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ग्रामविकास योजनांच्या अनुषंगाने नाशिक विभागाची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय येथील नियोजन सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, अपर आयुक्त अजय मोरे, उपायुक्त उज्ज्वला बावके आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री श्री. गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे. ग्रामविकास विभागाने त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज असून त्याबाबत अधिकारी वर्गाने अधिक सकारात्मक पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, प्रत्येक सामान्य माणसाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण आवास योजनेतील अनुदान हफ्ता लाभार्थ्यांना देण्यासोबतच नरेगा मधूनही केंद्र सरकारचा हफ्ता लाभार्थ्यांना मिळेल, याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रधानमंत्री ग्रामीण आवास टप्पा १ व १ योजनेसह रमाई आवास योजना, ग्रामीण घरकुल योजना, मोदी आवास योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, लखपती दीदी, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, ग्रामपंचायत विकास आराखडा, १५ वाया वित्त आयोगातील खर्चाचा आढावा, ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आदींचा तपशीलवार आढावा मंत्री श्री. गोरे आणि राज्यमंत्री श्री.कदम यांनी घेतला.
मंत्री श्री. गोरे म्हणाले की, अधिकारी कसे काम करतात यावर त्या योजनेचे यश अवलंबून असते.त्यामुळे अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. आवास योजनेत कोणत्याही प्रकारे लाभार्थ्यांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बचत गटातील महिलांच्या उत्पादन विक्रीसाठी उमेद मॉलची निर्मिती, सामान्य नागरिकांच्या तक्रारींची स्थानिक पातळीवर दखल, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सौजन्याची वागणूक याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. गोरे यांनी दिल्या.
मंत्री श्री. कदम यांनी, जिल्हा परिषदेला ठरवून दिलेल्या विविध योजनांच्या उद्दिष्टांची अंमलबजावणी व्हावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. अधिकाऱ्यांनी ग्रामीण स्तरावर जाऊन योजनांच्या अंमलबजावणी बाबत आढावा घ्यावा, अशा सूचना केल्या.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती दिली.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह आशिष येरेकर (अहिल्या नगर), श्री. अंकित (जळगाव), सागरकुमार (नंदुरबार), विशाल नरवाडे (धुळे) हे मुख्य कार्यकारी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.