सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरातच्या दिशेने दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर जायखेडा पोलिसांच्या पथकाने ताहाराबाद येथे सोमवारी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांची विदेशी दारू व कंटेनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान सटाण्याकडून एका कंटेनरमध्ये विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह ताहाराबाद अंतापूर चौफुली येथे सापळा रचून (जी जे १५ एव्ही ६२१८) या कंटेनरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक आणि क्लीनर कंटेनर थांबवून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी कंटेनरचा दरवाजा तोडून पाहणी केली. त्यात लाखो रुपयांचा मद्यसाठा आढळून आला.