नाशिक – सारेगमप लिटिल चॅम्पच्या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करायची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही तर वादक मित्रांमध्ये देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात ४ छोटे वादक मित्र साथ देताना दिसणार आहेत.
यामध्ये नाशिकचा ११ वर्षांच्या जय अविनाश गांगुर्डेचा समावेश आहे जो कोंगो तुंबा वाजवताना दिसेल. जय वयाच्या दोन वर्षापासून हे वाद्य वाजवतोय तसंच त्याला अटल गौरव अलंकार मध्य प्रदेश सरकार पुरस्कार मिळाला आहे. वडील अविनाश गांगुर्डे यांच्या ए जी म्युझिक अकॅडमी कामटवाडा तसेच गुरु अनुपम घटक मुंबई यांच्याकडे कोंगो तुंबा. आणि पं जयंत नाईक यांच्याकडे तबला शिकतोय..कोल्हापूरची तन्वी धनंजय पाटील ही वयाच्या आठ वर्षांपासून वाद्य वाजवत असून तिला मेंडोलिन, जलतरंग हार्मोनियम, कीबोर्ड आणि व्हायोलिन वाद्ये वाजवता येतात ती लिटिल चॅम्प्सच्या गाण्यांमध्ये मेंडोलिन वाजवून साथ देणार आहे.तसंच कोल्हापूरचाच सोहम सचिन जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना दिसणार आहे. सोहम वयाच्या बाराव्या वर्षांपासून संतूर तर तिसऱ्या वर्षांपासून बासरी शिकत आहे. औरंगाबादचा सोहम उगले हा प्रेक्षकांना कार्यक्रमात संबळ वाजवताना दिसेल, तो वयाच्या चौथ्या वर्षांपासून संबळ शिकतोय. आपण क्वचित पाहिलेली वाद्य देखील ही मुलं अगदी सहज वाजवतात. ‘छोट्यांचे मोठ्ठ स्वप्न साकारणार’ असं म्हणत खऱ्या अर्थाने सारेगमपचा मंच हा या मुलांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देतोय. सारेगमप लिटिल चॅम्प्स २४ जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वा. झी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे.