नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी आमदार जयप्रकाश छाजेड (७६) यांचे मंगळवारी रात्री दुःखद निधन झाले. काँग्रेसचे जेष्ठ नेते असलेले छाजेड हे कामगार चळवळीत सक्रीय होते. ते महाराष्ट्र इंटकचे प्रदेशाध्यक्ष तर राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. त्यांना हृदविकाराचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर सहा महिन्यापूर्वीच उपचार करण्यात आले होते. त्यातून ते बरे झाल्यानंतर पुन्हा सक्रीय झाले होते. पण, प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना सुयश हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांनाच त्यांचे निधन झाले. त्यांची अंतिमयात्रा ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता काढण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवन येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.