मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे शनिवार, दि. २८ ऑगस्ट रोजी निधन झाले. रात्री दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार-लेखिका संध्या नरे-पवार व मुलगी असा परिवार आहे. अत्यंत वेगळ्या शैलीतील नाटककार आणि संवेदनाशिल लेखक अशी आगळीवेगळी छाप जयंत पवार यांच्या लेखनाने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाडली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. २०१४ च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. याशिवाय अनेक संस्था संघटनांनी त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या वेगळ्या विचार व लेखनशैलीचे राज्यभरात अनेक चाहते होते. वृत्तपत्र स्तंभ वाचकांचे ते आवडते लेखक होते. त्यांनी अनेक नाटके लिहिली त्यातील प्रमुख नाटके आणि प्रसिद्ध पुस्तकांत अंधातर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन, दरवेशी, पाऊलखुणा, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक, माझे घर, वंश आदींचा समावेश आहे. त्यांच्या अकाली जाण्याने साहित्य ,नाट्य तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
‘साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्य, साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.