मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. अबूधाबी येथे पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झाला. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला दुबईत युएई संघाशी झाला. त्यानंतर आज १४ तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे. पण, हा सामना रद्द होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भाजपचे नेते दोन महिन्यांपूर्वी म्हणत होते की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही आणि आज ते म्हणत आहेत की आम्ही पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू. त्यांचा रंग दर महिन्याला बदलत राहतो आणि म्हणूनच आपले परराष्ट्र धोरण सतत अपयशी ठरत आहे आणि जगाने हे अनुभवले आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हा सामना भारतीय संघाने खेळू नये अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने सुध्दा केली आहे.
बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा
बीसीसीआयने हा सामना खेळण्याची परवाणगी दिली असली तरी सुध्दा भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळू नये असे अनेक नेत्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे काही तास शिल्लक असतांना भारतीय संघ या सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान देशात सर्वत्र होणा-या विरोधामुळे आजच्या सामन्यामध्ये खेळाव की नाही अशा संभ्रम अनेक खेळाडूंच्या मनात आहे. कोच गौतम गंभीरसह सर्व स्टाफ याबाबत चर्चा करत आहे. दरम्यान या सामन्यात व्यावसायिक राहून मॅचकडे बघण्याचा सल्ला खेळाडूंना देण्यात आला आहे.
असे आहे गट
येत्या २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.