इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बिग बी अमिताभ बच्चन हे जसे त्यांच्या काळात ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जात होते. अगदी तशीच ओळख त्यांच्या पत्नी जया बच्चन यांची सध्या आहे. प्रसार माध्यमांवर जया बच्चन यांचा राग वारंवार निघत असतो. सार्वजनिक ठिकाणीही जया भडकल्याचे किस्से आहेत. त्यांच्यासोबत फोटो किंवा सेल्फी काढू इच्छिणाऱ्यांना या रागाचा सामना अनेकदा करावा लागतो. त्याचे अनेक किस्से सोशल मीडियावर फिरत असतात, त्यात आता आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे.
दिवाळीच्या दिवशी बच्चन कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे पार्टी ठेवली होती. ही पार्टी पापाराझींसाठी नेहमीच खास असते. त्यामुळेच पार्टीनंतर बच्चन कुटुंबियांचे फोटो काढण्यासाठी पापाराझींनी ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेर गर्दी केली. पण त्यांनी केलेली ही गर्दी जया बच्चन यांना रुचली नाही. आणि त्यांनी या पापाराझींना पार हाकलूनच लावले. जया यांचा हा ताजा व्हिडीओ नेटवर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यावर कमेंट्स देखील येत आहेत. ‘इसका हमेशा कुछ न कुछ होता है, इतना घमंड तो रावण को भी नही था’, अशी कॉमेंट एका युझरने केली आहे.
मुळातच जया बच्चन यांना एवढा राग का येतो, याचा शोध घेतल्यावर हे लक्षात आलं की, त्यांना क्लॉस्ट्रोफोबिक हा आजार आहे. जया यांचा मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता यांनी मध्यंतरी ही माहिती दिली होती. हा आजार म्हणजे एक मानसिक स्थिती आहे, ज्यात गर्दी पाहून घाबरायला होते. कोणी जवळ आलं किंवा कोणाचा चुकून जरी स्पर्श झाला तरी बेचैन वाटतं. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात अभिषेक आणि श्वेता यांनी हा खुलासा केला होता. कदाचित हेच कारण असावं, ज्यामुळे जया बच्चन फोटो किंवा सेल्फी घेण्यासाठी आपल्याजवळ येणाऱ्यांना फटकारत असाव्यात. आणि मीडिया प्रतिनिधी त्यांच्या रागाला बळी पडत असावेत.