नाशिक – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील व सध्या अंबड गावानजीक असलेल्या कंफर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे या सैन्यदलामधील जवानाचा अपघाती मृत्यू झाला. सोनवणे जम्मू कश्मीर या ठिकाणी सैन्यदलात देशसेवेत कार्यरत होते. मंगळवारी सैन्यदलाच्या कार्यालयातून त्यांच्या पत्नीला फोन आला की आपले पती एका अपघातात शहीद झाले आहेत. या घटनेने संपूर्ण सोनवणे कुटुंबीय हादरले. सोनवणे ३० ऑक्टोबरला सेवा निवृत्त होणार होते. या सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांनी मुलीला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी तीला आपण सर्वजण सोबतच राहू, माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबती असलेल्या सर्व मित्रांनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे. आपण खूपच मज्जा करू. असे सांगितले. पण, सेवानिृत्तीला २५ दिवस बाकी असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
सोनवणे कुटुंबीयांचे दुर्दैव असे की गणेश सोनवणे यांचे दोन्ही बंधूचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आणि काल ते देशसेवा करीत असतांना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा पार्थिव बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांचा अंत्यविधी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे होणार आहे.