नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जात पंचायतीच्या माध्यमातून अवघ्या एक रुपयात फोनवर महिलेचा घटस्फोट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पहिल्या पत्नीचा घटस्फ़ोट झाला नसतांना नवर्याने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जात पंचायतीला मान्य नाही. फोनवर घटस्फ़ोट केल्याचा घृणास्पद प्रकार सिन्नर येथे घडला आहे. यासंदर्भात जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी माहिती दिली आहे.
चांदगुडे म्हणाले की, सिन्नर येथील अश्विनी या महिलेचे लोणी (अहमदनगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तीचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली. याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जात पंचायत बसवली. जात पंचायतीने सदर महिलेला न विचारता तीच्या अनुपस्थितीत तीचा घटस्फ़ोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला. जात पंचायतीने सदर महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासुन रोखले. तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तीला अवघड गेले.आठ दिवसांपूर्वी तिच्या नवर्याने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असय्य झाला. सामाजिक कार्यकर्त्यामुळे ही बाब समोर आली आहे.न्यायालयाने घटस्फ़ोट दिला नसतांना पंचांच्या भूमिकेमुळे नवर्याने दुसरे लग्न केले. त्यामुळे जात पंचायतच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली जातपंचायतीचे पंच व सासरचे या विरोधात तक्रार करायला तयार करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व अॅड रंजना गवांदे हे मदतीसाठी पुढे आले आहे.
“राज्य सरकारने जात पंचायतच्या मनमानी ला आळा घालण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला परंतु जात पंचाच्या दहशत समाजात अजुनही कायम आहे. प्रबोधनासोबत सदर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास जात पंचायतींना मूठमाती देता येईल”, असे कृष्णा चांदगुडे म्हणाले.
अधिक माहितीसाठी संपर्क:
कृष्णा चांदगुडे मो-9822630378