श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष लेखमाला:
देवकी बालकृष्ण यांचे जगातील एकमेव मंदिर!
भगवान श्रीकृष्णाला जन्म देणार्या देवकी आणि बालकृष्ण किंवा देवकी आणि कृष्ण यांचे चित्र,फोटो मूर्ती किंवा मंदिरं कुणाच्या पाहण्यात किंवा ऐकीवात नाही . देवकी ही श्रीकृष्णाची सख्खी जन्मदात्री माता असुनही देवकी आणि तिचा विश्वप्रसिद्ध पुत्र श्रीकृष्ण यांचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पूजा होत असल्याचे दिसून येत नाही. परंतु देशांत असे एक गाव आहे जिथे बालकृष्णाची त्याच्या देवकी मातेसह पूजा केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त’ इंडिया दर्पण’ मध्ये सादर करण्यात येणार्या या विशेष लेख मालेत आज आपण सर्वप्रथम देवकी माता आणि बालकृष्ण यांची जेथे नित्य पूजा केली जाते त्या जगातल्या एकमेवाद्वितीय मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत.
भगवान विष्णुचे सुप्रसिद्ध दहा अवतार सर्वांना माहित आहेत.त्यातही श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन अवतार केवळ देशातच नाही तर सगळ्या जगांत प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाचे तर जन्मापासून अवतार कार्य समाप्त होई पर्यंतचे संपूर्ण जीवनच संघर्षमय होते असे म्हणता येईल. देवकी ही श्रीकृष्णाची माता आहे. तिने कंसाच्या कारागृहात श्रीकृष्णाला जन्म दिला त्यानंतर कृष्णाचे पिता वसुदेव यांनी श्रीकृष्णाला गोकुळात नेले हे सर्व जगाला ठावुक आहे. यशोदेने श्रीकृष्णाला लहानाचे मोठे केले त्यामुले यशोदा हीच आपली माता आहे असे भगवान श्रीकृष्णासह सर्वांना वाटायचे.
यशोदा आणि बालकृष्ण यांचे अनेक चित्रं,फोटो,मूर्ती आणि मंदिरं देशभर पहायला मिळतात. भाविक अत्यंत श्रद्धेने या मंदिरांत जातात. नतमस्तक होतात असे आपण पहातो. परंतु भगवान श्रीकृष्णाला जन्म देणार्या देवकी आणि बालकृष्ण किंवा देवकी आणि कृष्ण यांचे चित्र,फोटो मूर्ती किंवा मंदिरं कुणाच्या पाहण्यात किंवा ऐकीवात नाही . देवकी ही श्रीकृष्णाची सख्खी जन्मदात्री माता असुनही देवकी आणि तिचा विश्वप्रसिद्ध पुत्र श्रीकृष्ण यांचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पूजा होत असल्याचे दिसून येत नाही. परंतु देशांत असे एक गाव आहे जिथे बालकृष्णाची त्याच्या देवकी मातेसह पूजा केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सादर करण्यात येणार्या या विशेष लेख मालेत आज आपण सर्वप्रथम देवकी माता आणि बालकृष्ण यांची जेथे नित्य पूजा केली जाते त्या जगातल्या एकमेवाद्वितीय मंदिराची माहिती जाणुन घेणार आहोत.
आपल्या भारतात विविध देव देवतांची हजारो नव्हे तर लाखो मंदिरं पहायला मिळतात.किंबहुना भारत देश म्हणजे मंदिरांचा, साधूंचा, रस्तोरस्ती फिरणार॒या गाई गुरांचा आणि भिकार्यांचा अस्वच्छ देश आहे असे पाश्चिमात्य देशांना आजही वाटते. काही अंशी ते खरेही आहे. आपले कुठलेही धार्मिक ठिकाण घ्या तिथे असेच दृश्य पहायला मिळते. असो.
देशातील कोटयावधी भाविक आपापल्या आराध्य देवतेचे न चुकता भजन पूजन आणि नामस्मरण करतात. तसेच आपल्या आराध्य देवता कुलदेवता यांचे मंदिरांत जावून दर्शनही घेतात. आपल्या देशांत हजारो वर्षांपासून लाखो मंदिरं बांधली गेलेली आहेत.या मंदिरांना केवळ धार्मिक, सांस्कृतिकच नाही तर पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे.यातील शेकडो मंदिरं स्थापत्य कलेचा अदभुत नमूना म्हणून वन्दनीय देखील झालेली आहेत.
भगवान विष्णुंनी जगाच्या कल्याणार्थ दहा अवतार घेतल्याचे सर्वश्रुत आहे.या दहा अवतारातील सर्वांत लोकप्रिय अवतार म्हणजे भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अवतार समजले जातात. भगवान श्रीकृष्णाने तर भगवद्गीता सांगुन सगळ्या जगाला जगावे कसे हे समजावून सांगितले आहे. त्यामुले भगवान श्रीकृष्ण हा खर्या अर्थाने जगद्गुरु म्हणून मान्यता पावला आहे. भगवान विष्णुचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाची जगभर अक्षरश: लाखो मंदिरं आहेत.
भगवान श्रीकृष्णाच्या या मंदिरांत राधा-कृष्ण, रुख्मिणी-कृष्ण, बलराम भैया, सुभद्रा आणि कृष्ण, यशोदा -कृष्ण यांच्या मूर्ती असलेली असंख्य मंदिरं पहायला मिळतात. परंतु श्रीकृष्णा जन्म देणार्या देवकी सोबत बालकृष्णाचे एकतरी मदिर आपल्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आहे का? याचे उत्तर बहुदा नाही असेच येईल. मात्र देशांत असे एक गाव आहे जिथे बालकृष्णाची त्याच्या जन्मदात्या मातेसह देवकी सह नित्य पूजा अर्चा केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण याच जगवेगळया एकमेवाद्वितीय दुर्मिळ मंदिराची माहिती जाणुन घेतो आहोत.
आता आपली उत्सुकता अधिक ताणून ना धरता सांगुन टाकतो हे मंदिरं दुसरं तिसरं कुठे नाही तर आपल्या कोकण पट्टीतील गोव्यात आहे! कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतांत नारळी पोफळीच्या बागा, स्वच्छ,नेटका समुद्र किनारा . कोकणातील मंदिरं आणि मंदिरांच्या रचना वैशिष्ट्येपूर्ण असतात. त्यांना ऐतिहासिक आणि संदर्भ असतात. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने देखील ही मंदिरं वैशिष्ट्येपूर्ण असतात. गोव्यात तर अशी अनेक मंदिरं आहेत. येथील प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्ये, इतिहास, आख्यायिका, मान्यता वेगवेगळया आणि वैशिष्ट्ये पूर्ण असतात. गोव्यातील देवकी बालकृष्णाचे मंदिरही याला अपवाद नाही.
गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथे गेलो असता तिथून १७-१८ किमी अंतरावर ‘माशेल’ नावाचे गाव असल्याचे समजले. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे हे गाव असल्याने तिथे जायचे ठरविले होते. पण याच ‘माशेल’ गावात बालकृष्ण आणि माता देवकी यांचे जगातले एकमेवाद्वितीय मंदिर असल्याचे समजल्यावर माशेल येथे जायचे पक्केच केले.
पणजी पासून १८ किमी अंतरावर माशेल आहे येथेच देवकी आणि बालकृष्ण यांचे अतिशय पुरातन परंतु देखने मंदिर आहे. या मंदिराची मूळ स्थापना मांडवी नदीवरील ‘चोडण’ नावाच्या बेटावरील गावात करण्यात आली होती.परंतु त्याकाळी म्हणजे इ.स. १५३० पूर्वी पोर्तुगीज लोकांनी आक्रमण करुन हे मंदिर उध्वस्थ केले होते. त्यामुळे इस. १५३० ते १५४० ही धा वर्षे धर्मांध पोर्तुगीज लोकांपासून या मंदिरातील देवकी आणि कृष्णाची मूर्ती सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवण्यात आली होती अशी माहिती येथील पुजारी आणि स्थानिक मंडळींनी सांगितली. पुढे परिस्थिती निवळल्यावर इ.स. १५४० ते १५६७ या कालावधीत माशेल गावांत देवकी कृष्णाच्या मंदिराची उभारणी करण्यात आली असा या मंदिराचा इतिहास आहे. माशेल गावात देवकी कृष्णाच्या या जगातल्या एकमेव मंदिरा प्रमाणेच इतर देवी देवतांची १५ लहान मोठी मंदिरं आहेत.
कोकण आणि गोव्यात रवळनाथ या देवांचे खूप महत्व आहे. रवळनाथ हे शिवाचेच एक रूप असल्याचे कोकणात मानले जाते. विशेषत: दक्षिण कोकणातील प्रत्येक गावात रवळनाथाचे मंदिर किंवा मूर्ती आढळते. दक्षिण कोकणाचा संरक्षक क्षेत्रपाल म्हणून रवळनाथ ओळखला जातो. माशेल गावातील या मंदिरात रवळनाथ आणि लक्ष्मी देवी यांच्या मूर्ती असल्या मुळे या मंदिराला ‘देवकी कृष्ण रावळनाथ’ किंवा ‘लक्ष्मी रावळनाथ मंदिर’ असेही स्थानिक लोक म्हणतात. सुरुवातीला अतिशय लहान असलेल्या या मंदिराचा इ.स. १८४२ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर ह्ल्लीचे भव्य ‘देवकी बालकृष्ण मंदिर’ बांधण्यात आले असे सांगितले जाते.
‘देवकी-कृष्ण’ मंदिराचा हा परिसर अत्यंत निसर्ग संपन्न, विलोभनीय, शांत आणि प्रसन्न असल्याचा अनुभव येथे येतो. देवकी कृष्ण मंदिराच्या परिसरांत रवळनाथ आणि लक्ष्मी माता विराजमान असल्याने या मंदिराला ‘लक्ष्मी रवळनाथ मंदिर’ असेही म्हणतात.या मंदिरा मागे एक लहानसे मंदिर आहे त्याला ‘पिसो रवळनाथ’ असे म्हणतात.
गोव्यातील लहान व मोठ्या मंदिरांची रचना वैशिष्ट्ये पूर्ण असते. खरं सांगायचं तर गोव्यतली सगळी मंदिरं बाहेरून सारखीच दिसतात. देवकी-कृष्ण मंदिरही याला अपवाद नाही.मंदिराच्या मुख्य गाभार्यात देवकी माता आणि बालकृष्ण यांच्या अतिशय लोभस आणि प्रसन्न मूर्ती आहेत. देवकी मातेने हातांत बालकृष्णाला धरलेले आहे. अशा प्रकारचे देवकी व बालकृष्णाचे मंदिर आणि मूर्ती केवळ येथेच पहायला मिळते. यामुळेच तर हे मंदिर वैशिष्ट्ये पूर्ण आहे. गोकुळअष्टमीला येथे भाविकांची जणू जत्राच भरते.
देवकी माता आणि बालकृष्ण यांच्या प्रमाणेच या मंदिरांत भौमिकादेवी, लक्ष्मी, रवळनाथ, कात्यायनी आदि देवताही विराजमान झालेल्या आहेत. देवकी आणि बालकृष्ण यांची नित्य पूजा केली जाणारे हे जगातील एकमेव मंदिर असल्याचे मानले जाते. या मंदिरांत कृष्णाष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव तसेच नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याप्रसंगी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.
Jasnmashtami Special Devaki Balkrishna Temple by Vijay Golesar