जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लातूर येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत जरांगे यांनी समाचार घेतला. आरक्षण कसे मिळते, ते मला माहिती आहे, ते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते का, मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी समाज एकसंध ठेवला. त्यांच्यासारखे पक्ष काढून समाजाला तात्पुरता आनंद द्यायचा नव्हता. त्यांना हे सगळे बोलायचा ठेका देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे का, असा सवाल जरांगे यांनी केला.
राज यांनी जरांगे यांच्यावर टीका केली होती. सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले, तर त्यांना विचारा, की आरक्षण कसे देणार हे आधी सांगा. जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोर्च्यांचे काय झाले? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळाले? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, या गोष्टी तुमच्याशी अत्यंत विचारपूर्वक बोलतो. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतो. हीच सत्य परिस्थिती मी ज्या वेळी जरांगे पाटलांना भेटायला गेलो, त्या वेळी मी त्यांच्यासमोर मांडली होती, असे राज यांनी म्हटले. यावर जरांगे यांनी पलटवार केला.
ते म्हणाले, की आरक्षण कसे देणार माझ्या सामाजाला माहिती आहे, ते तुम्हाला कळणार नाही. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहिती? तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे माहिती आहे; पण अस्तित्व कसे टिकवायचे हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा आमचा एक वर्ग आहे. प्रामाणिक सांगतो की, त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे.
दरम्यान, लातूरच्या सभेत राज म्हणाले, की हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला माहिती आहे. जे तुम्हाला येऊन सांगतात ना, की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आले की पहिल्यांदा विचारा कसे? मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले जा, दिले आरक्षण! म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकते का? कोणतेही राज्य सरकार देऊ शकते का? तामिळनाडूत असा प्रकार झाला. तामिळनाडू सरकारने सांगितले आरक्षण दिले. तो विषय सर्वोच्च न्यायालयात पडलेला आहे. त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्यावर आपण भांडतो आहोत.
……………..