इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीताच्या माध्यमातून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. या भावना समजण्यासाठी भाषेची अडचण कधीच येत नाही. म्हणूनच संगीत ही ईश्वराने दिलेली देणगी आहे, असं मानलं जातं. संगीत हे भाषेपलीकडलं असतं याचा अनुभव पुणेकरांनी नुकताच घेतलाय.
संगीतकार सलील कुलकर्णी यांच एक गाणं जपानमधून भारतात आलेल्या एका तरुणीने गायलं आहे. आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. मराठी भाषेची गोडी या तरुणीलाही लागली आणि त्यातूनच एक मराठी गाणं शिकून तिने ते सर्वांसमोर ते सादरही केलं. स्वतः सलील कुलकर्णी यांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर करून या पाहुणीचे कौतुक केले आहे.
‘चिंटू’ चित्रपटातील ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ हे गाणं जपानी मुलीच्या आवाजात इतकं गोड वाटत आहे की पुणेकर सुद्धा तिला दाद देण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. पुण्यातील करिश्मा सोसायटी येथील हा व्हिडीओ असून या इमारतीतील शीला कोपर्डे यांनी या जपानी गायिकेला गाण्याचे शब्द शिकवले होते. गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तिने हे गाणं सादर केलं. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये या तरुणीने केलेला पोशाख पारंपरिक जपानी आहे पण तिचे सूर, शब्द आणि उच्चार यामध्ये मराठीचा गोडवा जाणवतोय. तुम्ही व्हिडीओ सुरू करताच तिने म्हंटलेल्या धन्यवाद मध्ये याची प्रचिती येते.
दरम्यान, सलील यांनी हा व्हिडीओ शेअर करताच अनेक संगीतप्रेमींनी यावर प्रतिक्रिया देत या गायिकेला शाबासकी दिली आहे. संगीतासाठी ‘हे विश्वची माझे घर’ असते, हे आपण सिद्ध केले असे म्हणत अनेकांनी सलील कुलकर्णी यांचे सुद्धा कौतुक केले आहे.
https://twitter.com/KulkarniSaleel/status/1567110006092210181?s=20&t=qboT9ROPv3o201cCM62p7Q
Japanese Girl Sing Marathi Song Video Viral