मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण’ हा विशेष प्रशिक्षण उपक्रम 27 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान जपान येथे होणार असून हा उपक्रम पूर्णतः जपान सरकारद्वारे प्रायोजित आहे. या उपक्रमासाठी विशेष निवड झालेले महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे हे जपान येथे उपस्थित राहणार आहेत. जपान सरकारच्या “उद्योजकता व स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण” या विशेष प्रशिक्षण उपक्रमासाठी संपूर्ण भारतातून महाराष्ट्राची निवड होणे ही बाब महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची आहे, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
अलिकडच्या काळात, स्टार्टअप, इनोव्हेशन हे जागतिक व्यासपीठावर परवलीचे शब्द बनले आहेत. विविध देशांच्या आर्थिक प्रगतीत स्टार्टअप्स मोलाची भूमिका बजावत आहेत. भारताव्यतिरिक्त इतर देशही स्टार्टअप आणि उद्योजक समर्थनाची इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करत आहेत. स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी अलिकडच्या वर्षांत महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. स्टार्टअप परिसंस्थेची भरभराट मर्यादित न राहता, इतर देशांची परिणामी जागतिक विकास होण्याच्या दृष्टीने जपान सरकारकडून आशिया व आफ्रिका खंडातील देशांसाठी “उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण” हा विशेष प्रशिक्षण उपक्रम यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आला आहे.
जपानच्या मित्र देशातील स्टार्टअप व नाविन्यता परिसंस्थेच्या बळकटीकरणासाठी काम करणाऱ्या संस्था यासाठी पात्र होत्या. भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयामार्फत (DOPT) भारतातील सर्व राज्यातून अर्ज मागविण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत असलेली स्टार्टअप नोडल एजन्सी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत या विशेष उपक्रमासाठी अधिकाऱ्यांचे नामांकन करण्यात आले होते. जपानच्या मित्र देशातील सर्व देशांकडून प्राप्त अर्जांचे मूल्यांकन करून जपान सरकारने सर्वोत्तम ११ उमेदवारांची निवड केली असून संपूर्ण भारतातून फक्त महाराष्ट्राची निवड झाली आहे.
“उद्योजकता आणि स्टार्टअप इकोसिस्टम वृद्धीकरण” हा विशेष प्रशिक्षण उपक्रम 27 ऑगस्ट 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान जपान येथे होणार असून हा उपक्रम पूर्णतः जपान सरकारद्वारे प्रायोजित आहे. या उपक्रमासाठी विशेष निवड झालेले महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे हे जपान येथे उपस्थित राहतील. कोठावदे हे नाशिक जिल्ह्यातील कळवणचे सुपुत्र आहेत.
या प्रशिक्षणादरम्यान, इतर देशातील स्टार्टअप इकोसिस्टमचे घटक आणि आव्हाने, उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी विविध धोरणे आणि उपक्रम, जपानमधील स्टार्टअप इकोसिस्टम इ. समजून घेण्याची संधी मिळणार आहे. या निवडीबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार व नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. एन रामास्वामी यांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे यांचे अभिनंदन केले आहे.
Japan Special Training Amit Kothawade Selection Nashik Kalwan
Industry Startup Ecosystem