नवी दिल्ली – जगभरातून येणाऱ्या अव्वल खेळाडूंना नमवून सुवर्ण पदक पटकाविले आणि ते पदक जर कुणाच्या हलगर्जीपणामुळे तुटले तर? असाच काहिसा प्रकार जपानमध्ये घडला आहे. महापौरांनी आपल्या शहरातील ऑलिम्पिक खेळाडूचे सुवर्णपदक दाताने चावल्याने ते चक्क तुटले आहे. या सारा प्रकार संपूर्ण जगभरात विशेष चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला आहे.
जपानची महिला सॉफ्टबॉल अॅथलिट मियू गोटो हाल हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. पदक जिंकल्यामुळे तिला अपार आनंद झाला आहे. परंतु या जल्लोषाच्या रंगाचा बेरंग एका घटनेमुळे झाला. जपानच्या नागोया शहराचे महापौर ताकाशी कावामुरा यांनी गोटोच्या सुवर्णपदकाला दाताने चावल्याने ते तुटले. या घटनेनंतर मानो गोटोला खूपच दुःख झाले. महापौरांनी याबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. परंतु महापौरांविरोधात सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
द जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, ताकाशी यांनी सुवर्णपदक दाताने चावताच पदक तुटण्याचा आवाज आला. ही घटना समोर आल्यानंतर सामान्य लोक सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. वाद वाढत असल्याचे पाहताच महापौरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने (आयओसी) सुवर्णपदक बदलून देण्यास मान्यता दिली आहे. महापौरांनी माफी मागितल्यानंतर पुढील दोन दिवसात नागोया सिटी हॉलला सात हजारांहून अधिक ईमेल्स आणि फोन कॉल आले होते. त्यामध्ये महापौरांच्या कृतीवर कठोर टीका करण्यात आली.
आयओसी अॅथलिट आयोगाच्या सदस्या यूकी ओटा यांनी महापौरांच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या ट्विट करून सांगतात, या अॅथलिट आणि महापौरांमध्ये काय संबंध आहेत याबद्दल मला माहिती नाही, मात्र महापौरांसाठी अॅथलिटसाठी कोणताच आदर नाही. तसेच त्यांना कोरोना नियमांशीही काहीच देणेघेणे नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. संबंधित महिला अॅथलिटने सुवर्णपदक मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिचे सुवर्णपदक खराब केल्याच्या चुकीची मी मनापासून माफी मागतो. तसेच इतर लोकांचीही मी माफी मागतो, असे महापौरांनी सांगितले.