नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठाणचा यंदाचा जनस्थान पुरस्कार पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत हा पुरस्कार सोहळा पार पडला. मराठीमध्ये सृजनशील साहित्य निर्माण करणाऱ्या मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते मधू मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होत्या.
यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर मधू मंगेश कर्णिक यांनी आपल्या भाषणात मराठी बद्दल अनास्थेचा मुद्दा उपस्थितीत करत राजकारण्यांवर टीकाही केली. यावेळी ते म्हणाले की, मराठीबाबतची पोटतिडीक तुम्हाला मला आहे, पण, राजकारण्यांना मात्र की नाही. सरकारमधील बाबू लोकांमध्येही ती दिसत नाही. त्यामुळेच मी राजीनामा दिला. गेल्या काही वर्षांपासून मराठीची केवळ चर्चा होतेय, पण, घडत काहीच नाही. मुंबईत मराठीचा टक्का घसरतोय, मुंबई देशाची म्हणून देशभरातले लोंढे येतात. मुंबईत १९६२ साली ५२ टक्के मराठी टक्का, तर आता २०२१ मध्ये केवळ २२ टक्के मराठी आहे. मुंबई परिसरात ओडिशा भवन, मणिपूर, पंजाब भवन अशी अनेक राज्यांची भवन आहे. पण, आपल्या राज्याच्या राजधानीत ( मुंबईत ) महाराष्ट्र भवन नाही. मराठीसारखी अनास्था इतर प्रादेशिक भाषांबद्दल आढळत नाही. मराठीसाठी भरीव काम सरकार आणि राजकारण्यांनी करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी दहावीपर्यंत अभ्यासक्रमात मराठी सक्तीची हे साहित्यिकांनी एकत्र येऊन घडवून आणले आहे. मराठीसाठी अजून खूप काम करायते आहे, सर्वांनी पुढे या असे आवाहनही केले.
एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे साहित्य जीवन समृद्ध करणा-या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो. यंदा हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल देण्यात आला.
असा संपन्न झाला कार्यक्रम
कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी आयोजित केलेला जनस्थान पुरस्कार समारंभ स्थगित केला होता. त्यानंतर हा पुरस्कार शनीवारी कुसुमाग्रज स्मारकात विशाखा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार व कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम निमंत्रित ४० ते ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. इतर श्रोत्यासाठी हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान ह्या फेस बुक पेजवरून ऑन लाईन बघितला गेला.