विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना. नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कादवा सहकारी कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी लिहलेला विशेष लेख
……
एक सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील व्यक्ती आपल्या जनसेवेच्या जोरावर गावचे सरपंच ते पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारू शकतो हे नरहरी झिरवाळ यांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिले असून दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ हे जनसेवक म्हणून अविरत कार्यरत आहे.
मी पंचायत समितीत सभापती म्हणून काम करत असताना माजी खासदार हरिभाऊ महाले यांच्यासोबत गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी धडपणाऱ्या कार्यकर्त्यांची तळमळ पाहता ‘नरहरी’ आपल्या गाव परिसर व तालुक्याच्या विकासात योगदान देईल हे वाटले होते व तसेच पुढे घडलेही.जनसेवेचे बाळकडू घेतलेले नरहरी नोकरीत रमले नाही. सामाजिक कार्य सुरू केले आदिवासी पश्चिम भागात युवकांचे संघटन करत गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी आदिवासी बांधवांना स्वयंपूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या नरहरी यांचे गुण वनारे गावच्या जेष्ठांनी हेरत त्यांना गावच्या सरपंच पदी बिनविरोध बसवले. पुढे पंचायत समितीत पाठवले. जिल्हा परिषदेत संधी दिली. या संधीचे सोने करत झिरवाळ यांनी जनतेशी मोठा जनसंपर्क वाढवत तालुक्याचे विकासकारण सुरू केले..
दररोज लोकांच्या कोंडवळ्यात राहणारा हा माणूस कोणत्याही व्यक्तीला तर वाकून नमस्कार करणारच. पण, शासकीय कार्यालयातील साहेब असो की शिपाई नम्रपणे नमस्कार करत जनतेचे काम किती महत्वाचे आहे हे पटवून देणार व काम करून घेणारच. दिंडोरी पंचायत समिती असो की तहसील कार्यालय रोज अनेक रेशनकार्ड,संजय गांधी निराधार योजनाचे फॉर्म असो की जातीचे दाखले ,शेतकऱ्यांसाठी योजना ,दवाखान्यात कुणी एडमिट असो त्याला मदत आदी लोकांचे प्रश्न सोडवत फिरणारे झिरवाळ. दुपार झाली की तेथेच पारावर लोकांसोबत न्याहारी करणार व पुन्हा काम सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले. आमदारकी चे तिकीट मिळाले नाही तरी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पुढे त्याचेच फळ मिळत पक्षाने त्यांना तिकीट दिले ते आमदार झाले.त्यांच्या कामाची पावती त्यांना जनतेने वर्गणी काढून देत तीनदा आमदारकी दिली.एक वेळी अवघ्या १४९ मतांनी पराभव झाला. पण, तरीही जनसंपर्क न तोडता काम सुरू ठेवले अन पुढच्या वेळी लोकांनी भरभरून मते देत निवडून दिले. गेल्यावेळी तर विक्रमी मतांनी निवडून दिले.
विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून देत जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली .तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते पूर्व भागात वळविण्याचा महत्वकांक्षी मांजरपाडा प्रकल्प सह बारा वळण योजना तीन लघु पाटबंधारे योजनांना त्यांनी मंजुरी मिळवली. आज त्यातील अनेक कामे पूर्ण झाली असून या परिसराचे नंदनवन होत आहे. नागली वरई पिकांच्या जागी आता बारमाही बागायती पिके होऊ लागली आहे. पूर्व भागात दिंडोरी तालुक्यासह चांदवड निफाड येवला नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे.
दिंडोरी तालुका सुजलाम सुफलाम होत आहे. पेठ तालुक्यातही अनेक योजनांना गती देत तिकडे ही आता शेती समृद्ध होत आहे. आदिवासी शेतकरी स्वयंपूर्ण होत आहे. पेठ तालुक्यालाही विकासाच्या वाटेवर त्यांनी नेले आहे. शेती विकास संबंधित प्रत्येक योजनेचे बारकावे जाणत ते काम करत आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही ते मिळवून देण्यासाठी परवाच मुंबईत बैठक घेऊन त्यात मार्ग काढण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून संधी दिली आहे. तेथेही ते आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे .सर्व मंत्री अधिकारी यांचेशी असलेले आदरयुक्त संबंध अभ्यासपूर्ण प्रश्नांची मांडणी यामुळे नाशिक जिल्ह्यासोबतच पूर्ण राज्यातील समाजातील सर्वच घटकांच्या व आदिवासी बांधवांच्या समस्या सुटाव्या यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. दर रविवारी त्यांच्या मळ्यात पहाटेपासून रात्री पर्यंत जनता दरबार भरतो या ठिकाणी जिल्ह्यासोबतच राज्यातील लोक आता आपले प्रश्न घेऊन येत आहे. दिंडोरी पेठ तहसील असो की मंत्रालय जनतेचा राबता त्यांच्यासोबत सदैव असतोच.
कालच दिल्लीत केंद्रीय वनमंत्री,आदिवासी विकासमंत्री यांच्या भेटी घेत त्यांनी विविध प्रश्न मांडले आहे .रस्ते, वीज,आरोग्य,शिक्षण,शेती औद्योगिकरण,पर्यटन आदी सर्वच विषयात अभ्यास असलेले झिरवाळ सातत्याने जनतेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यांना त्यांचे या कार्यात सदैव यश येवो त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीराम शेटे
चेअरमन, कादवा सहकारी साखर कारखाना