जन्माष्टमी विशेष लेखमाला –
पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ:
श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली
तयार झालेली स्वर्गनगरी!
श्रीकृष्णावर पूर्ण भरवसा ठेवला तर तो शेवट पर्यंत साथ देतो, सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतो याचा पाण्डवाना वेळोवेळी अनुभव आला होता. याचा पांडवाना पहिला प्रत्यय आला तो इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना करताना. आज याच इंद्रप्रस्थ नगरीविषयी आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
दुर्योधनाच्या हट्टामुळे धृतराष्ट्राने पांडवाना त्यांच्याच हक्काच्या राज्यातून बेदखल केलं. केवळ भीष्म आणि विदुर यांच्या दडपनामुळे हस्तिनापुरपासून पन्नास कोसावर असलेले यमुनेच्या काठावरील खांडववन नावाचे घनदाट जंगल त्यांना देऊ केले आणि तिथे तुम्ही नगरी वसवून सुखाने रहा असा सल्ला दिला. आता त्या जंगलाचे एका नगरात रूपांतर करण्याचे आव्हान पांडवापुढे होते.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेउन खांडव वनात गेले आणि तिथले अवशेष त्याला दाखविले. अर्जुनाने विचारले,’ येथे आम्ही आमची राजधानी कशी करू?’ तेंव्हा श्रीकृष्णाने विश्वकर्माला आवाहन केले. विश्वकर्मा प्रकट होउन सांगतो, ‘हे प्रभो, या खांडव प्रस्थात मयासुराने नगर वसविले होते.ज्याचे आता केवळ अवशेष उरले आहेत.येथील प्रत्येक भाग मायासुर जाणतो.तुम्ही त्यालाच राजधानी बनविण्यासाठी का बोलवत नाही?’
यावर श्रीकृष्ण विचारतात, ‘यावेळी मयासुर कुठे भेटेल?’ त्यावेळी विश्वकर्मा मायासुराचे स्मरण करतो,तेव्हा मयासुर प्रकट होउन विचारतो, ‘प्रभु आपण माझी आठवण का केली?’ तेव्हा विश्वकर्मा त्याला सांगतो, ‘हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि हे अर्जुन आहेत.यांना या ठिकाणी एक नवीन नगरी निर्माण करायची आहे. हे ऐकून मयासुर अति प्रसन्न होतो. तो श्रीकृष्ण, अर्जुन आणि विश्वकर्मा यांना घेउन त्या पडीत अवशेषां जवळ जातो. तिथे एक रथ असतो. मयासुर त्यांना सांगतो, ‘हे श्रीकृष्णा, हा सोन्याचा रथ पूर्वीचे महाराज सोम यांचा होता. परंतु आपल्याला हा रथ मनोवेगाने इछित स्थळी घेउन जाईल.’ त्या रथात एक गदा ठेवलेली होती. मयासुर सांगतो,’ ही कौमुदची गदा आहे. पांडव पुत्र भिमा शिवाय ही गदा कुणीही उचलू शकणार नाही. हिच्या प्रहराची शक्ती अगाध आहे.’ त्यानंतर एक धनुष्य दाखवून सांगतो, ‘हे गांडीव नावाचे धनुष्य आहे. हे एक अदभुत आणि दिव्य धनुष्य आहे. दैत्यराज वृषपर्वा याने भगवान शिवाची आराधना करून हे धनुष्य मिळविले होते.’
भगवान श्रीकृष्ण ते धनुष्य उचलून अर्जुनाला देतात आणि सांगतात, ‘ अर्जुना, हे दिव्य शिवधनुष्य घेउन त्यावरून तू शर संधान करू शकशील.’ यानंतर मयासुर अर्जुनाला अक्षय भाता देतो आणि सांगतो, ‘यातील बाण कधीही संपत नाहीत.स्वत: अग्नीदेवाने हा अक्षय भाता दैत्यराजाला दिला होता.’ या नंतर विश्वकर्मा म्हणतात, ‘पांडुपुत्रा आजपासून इथल्या संपूर्ण संपत्तीचे अधिकारी आपण झाला आहात.’
शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘मयासुरा तू आमच्यावर जी कृपा केली आहे त्याच्या बदल्यात आम्ही तुला प्रतिदान तर देऊ शकत नाही. परंतु आम्ही तुला वचन देतो की संकटकाळी तू जेव्हा आमचे स्मरण करशील त्यावेळी मी आणि अर्जुन त्वरित तिथे उपस्थित होऊ.’ हे ऐकून मयासुर प्रसन्न होतो. त्यानंतर विश्वकर्मा आणि मायासुर दोघे मिळून इंद्रप्रस्थ नगर निर्माण करण्याचे कार्य करतात.
या नगरचे इंद्रप्रस्थ हे नाव भगवान इंद्रा वरून ठेवण्यात आले होते.कारण इंद्राच्या स्वर्गा सारखेच हे नगर बनविण्यात आले होते. भगवान श्रीकृष्णाने विश्वकर्माला भगवान इंद्राच्या स्वर्गा समान महान मगर निर्माण करायला सांगितले होते. विश्वकर्माने या नगरांत सुंदर उद्याने आणि प्रशस्त मार्ग निर्माण केले होते तर मयासुराने या राज्यात मयसभा नावाचा भ्रमित करणारा एक भव्य महाल तयार केला होता.
अशा प्रकारे पूर्वी खांडवप्रस्थ असलेले पड़ीत अवशेष आणि घनदाट जंगल यांचे विश्वकर्मा आणि मयासुर यांनी स्वर्गा समान सुंदर देखण्या इंद्रप्रस्थ नगरीत रूपांतर केले होते. हे नगर दिव्य आणि अदभुत होते. विशेषत: पांडवाचा महाल तर इंद्रजाला सारखा अदभुत बनविला होता. श्रीकृष्णाच्या द्वारकानगरी प्रमाणेच विश्वकर्मा आणि मयासुर यांनी अथक प्रयत्न करून मन लावून हे अदभुत नगर निर्माण केले होते.
आज आपण ज्या शहराला दिल्ली म्हणतो तिच प्राचीन काली इंद्रप्रस्थ नगरी होती. कुतुबमिनार जवळ असलेल्या ‘पुराना किला’ हे इंद्रप्रस्थ नगरीचे मध्यवर्ती ठिकाण असावे असे मानतात. खोदकामात सापडलेल्या अवशेषांवरून पांडवाची इंद्रप्रस्थ नावाची राजधानी याच ठिकाणी असावी असे पुरातत्ववेत्यांचा एक मोठा गट मानतो. महाभारत कालीन नगरांत जशा प्रकारची भांडी व इतर अवशेष सापडले अगदी तसेच सर्व अवशेष दिल्लीतील पुराना किल्ल्याच्या परिसरातील उत्खननात सापडले आहेत. दिल्लीत समाविष्ट असलेल्या सारवल गावात इस. १३२८ चा एक संस्कृत भाषेतील शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख दिल्लीच्या लाल किल्ला संग्रहालयात ठेवलेला आहे. या शिला लेखात हे गाव इंद्रप्रस्थ जिल्ह्यात असल्याचा उल्लेख आहे. वरील सर्व पुराव्यावरून हल्लीची दिल्ली हीच पांडव कालीन इंद्रप्रस्थ नगरी होती आणि तिची निर्मिती भगवान श्रीकृष्णाच्या इच्छे नुसार विश्वकर्मा आणि मयासुर यांनी द्वारके सारखी केली होती हे लक्षांत येते. होय ना!
Janmashtami Special Indraprastha Nagari
Vijay Golesar