श्रीकृष्ण जन्माष्टमी
विशेष लेखमाला
हस्तिनापुरात श्रीकृष्ण!
द्वारकेचा राणा पांडवा घरी
ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या सुरुवातीलाच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगात श्रीकृष्ण हाच विठ्ठल आहे असे सांगतांना म्हटले आहे.
” ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खूण|
द्वारकेचा राणा पांडवा घरी||”
पांडव आणि कौरव हे श्रीकृष्णाचे आते भाऊ होते. पांडवांची आई कुंती, श्रीकृष्णाचे पिता वासुदेव यांची बहिण होती.त्यामुळे सर्व पांडव आणि कौरव श्रीकृष्णाचे आतेभाऊ होते. बलराम आणि श्रीकृष्ण यांना पांडव आणि कौरव यांचे विषयी विशेष सख्ख्यं होतं. अर्जुन आणि श्रीकृष्ण तर सारख्याच वयाचे होते. त्यामुळे त्यांना एकमेकांविषयी अधिक आपुलकी, जवळीक वाटत असे. पुढे दोघांच्याही जीवनात विविध प्रसंग घडले. पांडव हस्तिनापुरात लहानचे मोठे झाले. त्यांना भाऊबंदकीने जगणे अवघड केले तर श्रीकृष्णाला त्याच्या सख्ख्या मामाने कंसाने जीवे मारण्यासाठी असंख्य प्रकार केले. शेवटी कृष्णाने कंसाचा वध केला आणि मथुरेचे राज्य त्याच्या नानाकड़े राजा उग्रसेन याच्याकडे सोपविले आणि यादवासह तो द्वारकेला गेला. तेथे त्याने स्वतंत्र नवीन राज्य स्थापन केले.
या सर्व घटनानंतर श्रीकृष्णाला पांडव द्रोपदी विवाह प्रसंगी सर्व प्रथम दिसले. पांडव त्यावेळी अज्ञातवासात असल्याने ब्राह्मणवेषांत होते. परंतु खांबावर फिरनार्या माशाचे खाली ठेवलेल्या जल पात्रातील प्रतिबिंब पाहून लक्ष्य वेध करणार्या अर्जुनाला श्रीकृष्णाने लगेच ओळखले आणि तो त्यांच्या मागे वनात गेला. तिथे पांडवांना आणि कुंतीला तो सर्व प्रथम भेटला. त्यानंतर पाण्डवांना भेटायला तसेच कौरव पांडव यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी तो अनेकवेळा हस्तिनापुर येथे गेला होता हे सर्वांना ठाऊक आहे.
हल्लीच्या हस्तिनापुरचे रंगरूप पूर्णत: बदलून गेले आहे. उत्तर प्रदेशांत दिल्ली पासून ११० किमी तर मेरठ पासून ३७ किमी अंतरावर दोआब क्षेत्रांत गंगेच्या काठावर हस्तिनापुर वसलेले आहे. दिल्ली-मेरठ-पौड़ी (गढ़वाल) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११९ वर हे शहर आहे. आधुनिक हस्तिनापुरची पुनर्स्थापना ६ फेब्रुवारी १९४९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केली. तोपर्यंत येथे काहीही नव्हते. १९५२ मध्ये प्रा. व्ही.व्ही लाल यांनी उत्खनन करुन जमिनीत गाडलेल्या हस्तिनापुरचे अवशेष शोधून काढले.
श्रीकृष्णाच्या काळापासून हस्तिनापुरचे नाव आपण ऐकत आलो आहोत. महाभारताचे प्रमुख केंद्र असलेले हस्तिनापुर प्रत्येक हिंदू मनात सदैव जागृत असते. हस्तिनापुरचे वर्णन अनेक प्राचीन ग्रंथात गजपुर, हस्तिनापुर, नागपुर, असदिवत, ब्रह्मस्थल, शांतिनगर आणि कुंजरपूर आदि नावांनी प्रसिद्ध आहे. यावरून या भागात त्याकाळी खुप हत्ती अस्तित्वात असावेत असा एक अंदाज केला जातो. सम्राट अशोक याचा पुत्र राजा सम्प्रति याच्या काळात येथे अनेक मंदिरे बांधली. परंतु काळाच्या ओघात ती सर्व नष्ट झाली.
हस्तिनापुरात राजा प्रतिप याच्या नंतर त्याचा मुलगा शंतनू, भिष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य, पांडु, धृतराष्ट्र,युधिष्ठिर याने महाभारत महायुद्धा नंतर ३६ वर्षे राज्य केले त्याच्या नंतर अभिमन्यु पुत्र परीक्षित आणि जनमेजय यांनी राज्य केल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथात केलेला आहे.
हस्तिनापुर विषयी प्रचंड आकर्षण होते. तीन चार वर्षांपूर्वी हृषिकेश वरून मेरठ मार्गे दिल्लीला येतांना याच मार्गावर असलेल्या हस्तिनापुर येथे थोडा थांबण्याचा योग आला होता. आमच्या गाडीचा ड्रायव्हर कम मालक हस्तिनापुरात राहणारा शीख होता. आमच्या बोलण्यावरून त्याने आम्हाला हस्तिनापुर विषयी असलेले आकर्षण जाणुन आम्हाला त्याच्या हस्तिनापुरातील घरी नेले. ते पारंपरिक शिख कुटुंब होतं. आम्ही त्यांच्या घरी चहा पाणी घेतला. एक दिड तास त्याच्या घरी थांबलो.
आता हस्तिनापुरात महाभारत काळातील काहीही, अगदी जुने अवशेष सुद्धा राहिले नाहीत. सध्या हस्तिनापुर जैन धर्मियांचे पवित्र ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. जैनांच्या २४ तिर्थंकारांपैकी १६,१७,आणि १८ क्रमांकाचे तीर्थंकर याच ठिकानाचे होते. त्यामुळे अनेक शतके येथे जैन धर्माचे प्राबल्य होते. आजही येथे सर्वत्र जैन मंदिरं आहेत. आणि देशभरातून लाखो जैन भाविक येथे येतात. हस्तिनापुर येथे आता पांडेश्वर महादेव मंदिर, करण मंदिर, कमल मंदिर ही हिंदू मंदिरं तर जैन भाविकसाठी दिगंबरजैन बड़ा मंदिर, जैन जम्बुद्वीप मंदिर आणि श्री श्वेतांबर जैन मंदिर ही सुस्थितील मंदिरं प्रेक्षणीय आहेत. या मंदिराशिवाय कैलाश पर्वत, अष्टपाद आणि १९८६ मध्ये स्थापन करण्यात आलेले हस्तिनापुर वन्यजीव अभयारण्य ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.
Janmashtami Special Article Shrikrishna in Hastinapur
Vijay Golesar