जन्मकुंडली दिशा आणि वास्तू प्रवेशद्वार
जन्मकुंडली दिशा आणि वास्तू प्रवेशद्वार याबाबत अनेक वाचकांनी प्रश्न पाठवले होते. त्याबाबत काही टिप्स मी वास्तू कुंडली तसेच आमच्या शेकडो वास्तूंचा निरीक्षणावरून देत आहे. या टीप्स फक्त स्वतंत्र प्लॉट वरच्या वास्तूसाठी आहेत.
जन्मकुंडलीतील वरचा भाग ती पूर्व दिशा मानली तर खालचा भाग पश्चिम दिशा, डाव्या बाजूचा भाग उत्तर दिशा, उजवा भाग दक्षिण दिशा मानावा. वास्तुशास्त्रात उपदिशांना विशेष प्रकारचे महत्त्व असते. कुंडलीतील उजवा कोपरा अग्नेया दिशा, दक्षिण पश्चिमेचा मधला कोपरा नैऋत्य दिशा, उत्तर पश्चिम येथील कोपरा वायव्य तर उत्तर पूर्वेचा कोपरा कुंडलीची ईशान्य दिशा होय.
मुख्य दिशांमध्ये ऊर्जा तयार होते. उपदिशांमध्ये तत्त्व तयार होतात. जन्म कुंडलीतील दिशा त्याचप्रमाणे थेट उपदिशांमध्ये कंपाउंड अथवा मुख्य प्रवेशद्वार घेणे टाळावे. कुंडलीतील मुख्य दिशांच्या स्थानामध्ये शुभ ग्रह नसल्यास आणि वास्तूचे प्रवेशद्वार त्याच भागाने यायचे असल्यास कंपाऊंड गेट ते मुख्य प्रवेश द्वार प्रदक्षिणा मार्गात घ्यावे.
कुंडलीतील उप दिशांच्या घरांमध्ये राहू-केतू-शनी-मंगळ हर्षल असल्यास त्या त्या भागातील मुख्य प्रवेशद्वार हे मुख्य कोपरा सोडून एकूण लांबीच्या समान दोन खाणे सोडून मोजून करावे. येथे देखील कंपाऊंड गेट प्रदक्षिणा मार्गात असावे. शक्य असल्यास थेट दक्षिण आग्नेय, थेट दक्षिण अथवा पश्चिम नैऋत्य त्याचप्रमाणे थेट उत्तर अथवा पश्चिम वायव्य या भागात मुख्य प्रवेशद्वार टाळावे.
बऱ्याच ठिकाणी सर्रास पूर्व ईशान्य अथवा उत्तर ईशान्य थेट कोपऱ्यात कंपाऊंड गेट अथवा मुख्य प्रवेशद्वार असते. असा थेट इश् तत्त्व प्रवेश सुद्धा टाळावा. जन्म कुंडलीतील रवी व गुरु सुस्थित असतील तर वास्तूच्या ब्रह्म तत्त्वापासून उत्तर मध्य ते पूर्व मध्य असा मुख्य प्रवेश घ्यावा.
(सूचना – तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन अंशात्मक दिशा निश्चिती करून घ्यावी. त्यानंतरच कंपाऊंड गेट तसेच मुख्य प्रवेशद्वारा बाबत निर्णय घ्यावा)