मीरा ढास, सहायक संचालक (माहिती)
….
आज कोरोना या आजाराविषयी बरीच चुकीची माहिती आणि गैरसमज विविध समाज माध्यमातून पसरवण्याचा पर्यंत होत आहे. परिस्थिती नक्कीच गंभीर तर आहेच. कोरोना संसर्गाच्या संकटाशी सामना करताना शासकीय आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन तसेच ग्रामविकास विभाग त्याचप्रमाणे समाजसेवकही काही सकारात्मक आणि पूरक काम करताना आपण पाहत आहोत. आजच्या घडीला कोरोना प्रतिबंधासाठी संशोधित झालेली लस ही आपल्या मानवी जीवनासाठी जीवनदान देणारे सुरक्षा कवच बनले आहे. याच अनुषंगाने जानेफळ या गावाने लसीकरण आणि कोरोना तपासणी करुन सर्वांच्या सहकार्याने टीमवर्कमुळे लसीकरणाचा १०० टक्के यशस्वी ‘जानेफळ पॅटर्न ‘ तयार केला आहे. याविषयी थोडक्यात….
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील अवघ्या ५२५ लोकसंख्येचे जानेफळ हे गाव. या गावात ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधकात्मक लसीकरण झाल्याने हे प्रथम लसीकरणात आपला स्वत:चा पॅटर्न तयार करणारे गाव ठरले आहे.
शासनाची आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील यांच्या पुढाकाराबरोबरच प्रत्यक्ष लोकसहभाग यामुळे शंभर टक्के लसीकरण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांची सर्वप्रथम कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये विशेष म्हणजे एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यानंतर लसकरण करण्यात आले. सरपंच कृष्णा गावंडे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गावात घरोघरी जाऊन जाणीवजागृती केली. यामध्ये काही महत्वाच्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग घेतला. गाव हे आपले कुटुंब समजून काळजी तर घेतलीच पण आरोग्याविषयी जाणीव जागृती व लसीकरण केल्यामुळे आजपर्यंत एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही.
ग्रामीण भागात बचत गट आणि अंगणवाडी सेविका ह्यांचा वावर घरापासून शेतापर्यंत सर्वांकडे असतो. याचा उपयोग अंगणवाडी सेविका म्हणून जानेफळ येथे काम करणाऱ्या सरला झाल्टे यांनी आपला अनुभव सांगितला की, गावात आगोदर लस टोचून घेण्यासाठी कोणी तयार होत नव्हते. यासाठी मी प्रथम आणि माझ्या बचत गटातील महिलांना लसीकरण करुन घेतले. त्यामुळे आधी आम्ही स्वत: लस घेतल्यानंतर काहीही त्रास होत नाही हे घरोघरी जाऊन सांगितले. गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती दूर करुन जे काही गैरसमज आहेत ते स्वत:च्या अनुभव सांगून दूर केले. यासाठी उदाहरण असे सांगितले की, ज्याप्रमाणे मुल जन्माला आलं की आपण पोलिओ, गोवर, इतर आजाराचे जसं लसीकरण करुन मुलांच भविष्या आणि आरोग्य सुरक्षित करतो तसेच हे लसीकरण आपल्या आरोग्याचे रक्षण कोरोनापासून करण्यासाठी महत्वाचे आहे, असं पटवून देण्यात यशस्वी झालो. त्यामुळे नंतर स्वखूषीने एका दिवसाच्या कॅम्पमध्ये सर्व गावातील नागरिकांनी लसीकरण करुन घेतले. हे लसीकरण करताना प्रत्येकाने मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर करत स्वत: बरोबर इतरांचीही काळजी घेतली.
तसेच या गावातील शेतकरी मुनीर पठाण यांनी प्रथम आपले स्वत:चे लसीकरण केले व कुटुंबातील 45 वर्षांच्या वरील वयाच्या सर्व सदस्यांचे लसीकरण करुन घेतल्याने कोरोना आजाराविषयीची भीती गेली असून हे आपल्या आरोग्याचे सुरक्षा कवच आहे, हे लसीकरण केल्यानंतर मी माझे दैनंदिन शेतीचे काम पार पाडले. मनातील कोरोनाविषयीची भीती दूर झाली असून एक प्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखे वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
फुलंब्री तालुक्यातील खुल्ताबाद रोडवर जवळपास 12 ते 13 कि.मी. अंतरावर असलेल्या गावांनी सर्व गावकऱ्यांच्या एकजूटीच्या निर्धाराने 100 टक्के लसीकरण तर केलेच शिवाय एकाही व्यक्तीला कोरोनाने बाधित झालेली नाही. हे महत्वाची बाब आहे. जानेफळ एकमेव अस गाव आहे जेथे कोरोनाबाधित तर कोणी झाले नाही आणि भविष्यात कोणी होवू नये म्हणून लसीकरणाचा फायदा ही गावाकऱ्यांनी घेतला आहे. ही एक सकारात्मक बाजू इतर गावातील गावकरी, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांनी घेतली तर लवकरच मदत होईल. यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींनी देखील याचा आदर्श घेऊन गाव सुरक्षित करुन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ‘जानेफळचा पॅटर्न’ नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो.